इचलकरंजी : येथील आय. जी.एम रुग्णालयामध्ये आयसीयू विभागातील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या हाईफ्लो मशीनला शॉर्टसर्किटने आग लागली. धूर येऊ लागल्याने लगेचच घटना लक्षात आली तेथील एका राक्षकाने अग्निरोधक बांबचा फवारा मारून आग आटोक्यात आणली. त्यामुळे अनर्थ टळला. आग लागल्याची माहिती मिळताच दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते, घटनेमुळे काहीकाळ धावपळ उडाली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आय.जी.एम रुग्णालयामध्ये वरील मजल्यावर अतिदक्षता विभागात एकूण 10 व्हेंटिलेटर बेड आहेत. त्यासोबत ऑक्सिजन पुरवठा करणारी हायफ्लो मशीन आहे. अत्यावश्यक रुणांना या मशीन मार्फत ऑक्सिजन पुरवठा केला जातो. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यातील एका मशीनच्या प्लगमध्ये तापून तापून धूर येऊ लागला, बघता बघता मशीनने पेट घेतला. धूर येऊन अतिदक्षता विभागात पसरल्याने अग्निशामक विभागास बोलावण्यात आले. तोपर्यंत तेथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांने स्विच बंद केले. तर एका सुरक्षा रक्षकाने तेथे अडकवलेला बंब फोडून पावडर फवारणी करून ती आग विझवली. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली नाही व मोठी दुर्घटना टाळली. या घटनेनंतर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक रवींद्र शेटे यांनी तातडीने पाहणी केली.