कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी महामार्ग-१६६ वरील बाधित भुये-भुयेवाडी येथील शेतक-यांनी गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित ५८ शेतकरी कुटुंबांचा प्रश्न मार्गी नाही लावला तर, ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाहीत, असा निर्णय या शेतकऱ्यांनी शुक्रवारी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत घेतला आहे.बाधित शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकारी क्रमांक ६ चे उपजिल्हाधिकारी आणि महामार्ग प्रकल्प संचालक व्ही. डी. पंदरकर यांची शुक्रवारी भारतीय किसान संघाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली. यावेळी त्यांनी जमिनीला मिळणारा कमी मोबदला, झाडे, घरे, शेड, गोठे, विहिरी, बोअरवेल यांचे होणारे मूल्यांकन योग्य व्हावे, तसेच ग्रामीण भागाला होणारे प्राधिकरणाचे तोटे, तसेच रेखांकनात झालेल्या गंभीर त्रुटी आणि त्याचे दीर्घकाळ होणारे दुष्परिणाम निर्दशनास आणून दिले. या सर्व गोष्टींचा निर्णय राज्य सरकारकडे गत दोन वर्षांपासून प्रलंबित आहे.पिकाऊ जमिनी कमी बाधित होतील आणि कमीत कमी अल्प भूधारक शेतकरी भूमिहीन होतील, याबाबत शाश्वत विकासाचा विचार करून राज्य सरकारकडून संबंधित शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा अन्यथा निवडणुकीत मतदान करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.लोकप्रतिनिधीच्या बैठकीमध्ये मंजूर केलेले एसएच-१९४ वरील राज्यमार्गाच्या दुतर्फाच्या रेखांकनामध्ये बदल करून नवीन रेखांकन बागायती जमिनीमधून केले आहे. यामुळे ५८ कुटुंबे बाधित होत आहेत. रेखांकन बदलाचा संबंध नाही, त्यांनी पैसे उचलले आहेत. पण, रेखांकन बदलाच्या संबंधित लोकांनी पैसे स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे सरकारकडून योग्य न्याय मिळेपर्यंत मतदान प्रक्रियेवर बहिष्कार असेल, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. महामार्ग अधिकाऱ्यांकडून सहकार्य आणि वेळ मिळेल, अशी अपेक्षा राजेंद्र पाटील या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
कोल्हापुरातील भुये-भुयेवाडी येथील महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार, ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय
By संदीप आडनाईक | Published: April 27, 2024 6:51 PM