कोल्हापूर : हद्दवाढीचा दिलेला प्रस्ताव हा चुकीचा व अन्यायकारक आहे, असा आरोप करत या प्रस्तावित हद्दवाढीच्या विरोधात सोमवारी अठरा गावांतील सुमारे पाच हजारांहून अधिक लोकांनी पुणे-बंगलोर महामार्ग रोखला. शासनाने चुकीच्या पद्धतीने निर्णय लादल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा हद्दवाढविरोधी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे देण्यात आला. तावडे हॉटेलजवळ रणरणत्या उन्हात अर्धा तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली.कोल्हापूर महापालिकेने दोन औद्योगिक वसाहती आणि १८ गावांवर हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे. या हद्दवाढीच्या प्रस्तावास संबंधित गावांचा विरोध आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कृती समितीचे अध्यक्ष संपतराव पवार-पाटील, प्रवक्ते नाथाजीराव पवार, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार सुजित मिणचेकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगलोर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून ठिय्या मारण्यात आला. यावेळी नेत्यांसह आंदोलकांनी ‘हद्दवाढ रद्द झालीच पाहिजे...’, ‘गाव आमच्या हक्काचे...नाही कुणाच्या बापाचे...’, ‘हद्दवाढ रोखा, शेतजमीन वाचवा...’, ‘हद्दवाढ कुणासाठी... कारभाऱ्यांसाठी...’, ‘हद्दवाढ कदापिही होणार...’, ‘शहर सजवायचं की माणसं जगवायची, याचा विचार करा...’ अशा घोषणा दिल्या. संपतराव पवार-पाटील म्हणाले, हद्दवाढी विरोधातील ग्रामीण जनतेच्या भावना शासनाला कळाव्यात, यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. अठरा गावांना शहरात घेऊन ग्रामीण जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आ. नरके म्हणाले, हे आंदोलन म्हणजे सुरुवात आहे. जर चुकीच्या पद्धतीने हद्दवाढीबाबत शासनाने भूमिका घेतल्यास आंदोलन तीव्र केले जाईल. हद्दवाढ नको म्हणून सर्व ग्रामपंचायतींसह जिल्हा परिषद व पंचायत समितींचे ठराव केले आहेत. त्याचा विचार शासनाने करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी हद्दवाढीचा प्रस्ताव फेटाळला आहे, असे असताना पुन्हा चर्चा का? आ. महाडिक म्हणाले, हद्दवाढ करून महापालिकेला शहराचा नाही तर स्वत:चा विकास करायचा आहे. विविध योजनांमधून केंद्र सरकारचा निधी गावांना मिळतो. त्यातून गावांचा विकास करण्यास ग्रामपंचायती सक्षम आहेत. त्यामुळे जबरदस्ती करणार असेल तर ते चालणार नाही, आमचे आंदोलन गांधीगिरीने सुरूच राहील.आ. मिणचेकर म्हणाले, आमची गावे स्वयंपूर्ण असताना हद्दवाढीत आम्ही का जायचे. कोणाला वाटते म्हणून ग्रामीण भाग शहरात कदापिही जाऊ देणार नाही. नाथाजीराव पवार म्हणाले, शासनाला ग्रामीण जनतेच्या भावना कळाव्यात व त्यांच्याकडून योग्य निर्णय व्हावा यासाठीच हे आंदोलन शांततेने केले आहे.प्रा. जालंदर पाटील म्हणाले, या आंदोलनाचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. हद्दवाढ जर लॅँडमाफियांना पोसण्यासाठी करणार असाल तर ती खपवून घेणार नाही. शेतकऱ्यांना उजाड करून कोणता विकास साधला जाणार आहे. नारायण पोवार म्हणाले, हद्दवाढ पाहिजेच म्हणूून सुरू असलेले आंदोलन हे लोकशाहीविरुद्ध आहे. (प्रतिनिधी)आमचं नरडं का घोटताय?विकासाच्या नावावर या १८ गावांतील जमिनींवर डोळा ठेवून आमचं नरडं का घोटताय? असा सवाल प्रा. जालंदर पाटील यांनी उपस्थित केला. शहर विस्ताराच्या नावाखाली दात आणि नखंपसरण्याचे काम सुरू आहे. याची भविष्यातील चाहूल ओळखूनच आम्ही या आंदोलनात सहभागी झालो आहोत, असेही त्यांनी सांगितले.आंदोलनातील उपस्थितीजिल्हा परिषदेचे सदस्य एस. आर. पाटील, बाजीराव पाटील, विलास पाटील, मंगल वळकुंजे, पंचायत समिती सदस्या अरुणिमा माने, महेश चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, बी. ए. पाटील, सुरेश सूर्यवंशी, बी. एच. पाटील, बाबासाहेब देवकर, नंदकुमार गोंधळी, नारायण पोवार, अमर जत्राटे, श्रीकांत भवड, राजू माने, युवराज माळी, मधुकर लोहार, राजू यादव, रावसाहेब दिगंबरे, सुरेखा चौगुले, एम. एस. पाटील, संदीप संकपाळ, आदी प्रमुख मान्यवर आंदोलनात सहभागी झाले होते.हद्दवाढ हटाओ...आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांच्या ‘हद्दवाढ हटाओ’ अशा घोषणा लिहिलेल्या टोप्या व विविध घोषणांचे फलक उपस्थितांचे लक्ष वेधत होते. रणरणत्या उन्हातही या आंदोलकांचा उत्साह कायम दिसत होता. हद्दवाढीला अठरा गावांचा प्रखर विरोधमहिलांनीही कंबर कसलीया आंदोलनात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ‘गाव आमच्या हक्काचे... नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत त्यांनीही रस्त्यावर ठाण मांडून हद्दवाढीला विरोध केला.चुकीचा निर्णय घेतल्यास परिणाम भोगावे लागतील कृती समितीचा इशारा
महामार्ग अर्धा तास रोखला
By admin | Published: March 15, 2016 1:02 AM