पन्हाळा: दाट धुके, गार वारा व पावसाच्या सरी अशा निसर्गरम्य वातावरणात 'जय भवानी..जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय, हर..हर..महादेव, नरवीर शिवा काशिद व बाजीप्रभू देशपांडे की जय..' या घोषणांनी संपूर्ण पन्हाळगड दणाणून गेला होता. ऐतिहासिक वातावरणात हिल रायडर्स फाउंडेशनच्या ६८ व्या पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंतीचा प्रारंभ झाला.या मोहिमेचा प्रारंभ प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे प्रादेशिक अधिकारी अंकुश पाटील, सचिन हरबट, हिल रायडर्स अडव्हेंचर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील, पन्हाळाचे माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, घोडावत ग्रुपचे प्रवीण डिग्रजे, यांच्या हस्ते वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाला. यावेळी हिलरायडर्सचे सागर बगाडे, विनोद कांबोज, बंडा साळोखे आदी उपस्थित होते. मोहिम सुरू करण्याच्याअगोदर सकाळी पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर येथील नरवीर शिवा काशिद समाधीला प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.अतिशय खडतर स्थितीत शिवाजी महाराजांनी काळोखात धो-धो पावसात पन्हाळगड ते पावनखिंड गनिमी कावा मोहीम सर केली होती. या मोहिमेत वीर बाजी प्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांच्यासह अनेक मावळ्यांनी बलिदान दिले. स्वराज्य स्थापनेसाठी राज्यांचा त्याग आणि मावळ्यांचे बलिदान शिवकालीन इतिहास आजच्या युवा पिढीला समजावा यासाठी हिल रायडर्स अडव्हेंचर फाऊंडेशन, कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती ट्रेकिंग मोहीम आयोजित करण्यात आली.पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेत एक हजार इतक्या मोठ्या संख्येने युवक युवती सहभागी झाल्या आहेत. यावेळी या मोहिमेत मुकबधिर असलेले पंधरा विद्यार्थी सहभागी झाले. मोहिमेत मुलुखगिरी ग्रुपच्यावतीने 'मुख्यमंत्री साहेब लक्ष द्या विशाळगडाला मुक्ती द्या, एक-एक इंच जमिनीचा हिशोब घ्या, विशाळगडाला मोकळा श्वास द्या, सर्वांचे लक्ष विशाळगडाकडे अशा अशायाचे फलक घेऊन युवक सहभागी झाले आहेत.
Kolhapur: दाट धुके, पावसाच्या सरी अन् 'जय भवानी..जय शिवाजी'च्या जयघोषात पन्हाळा-पावनखिंड मोहिमेला प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 5:50 PM