हातकणंगले तालुक्याच्या पूर्वेला तमदलगे, पश्चिमेला आलमप्रभू डोंगर, घोडावत युनिव्हर्सिटीजवळचा डोंगर, रामलिंग-कुन्थूगिरी डोंगर, मिणचे सावर्डे या ठिकाणी असलेला दीर्घ डोंगर रांग त्याचबरोबर उत्तरेला बाहुबली व नेज जवळील बाबूजमाल दर्गाच्या संपूर्ण डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत.
कोल्हापूर-सांगली हायवेवरून जाताना हिरवा शालू नेसलेल्या डोंगररांगा आपसूकच प्रवाशांना साद घालत असतात. पण कोरोनामुळे या सर्व ठिकाणांची भ्रमंती करता येत नाही, अशी खंत अनेक निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.
जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे डोंगरकपारीत असलेल्या झाडांना मुबलक पावसाचे पाणी मिळाले. त्याचा परिणाम हातकणंगले तालुक्यातीलदेखील डोंगराळ भागात झाला आहे.
त्यामुळे तालुक्यातील सर्व डोंगर बहरलेले आहेत शिवाय बहुतांशी डोंगर सुरक्षित असल्यामुळे निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमींना साद घालत आहेत. पण कोरोनामुळे सर्वांची निराशा होत आहे.
फोटो-हातकणंगले तालुक्यातील अलमप्रभूच्या डोंगराजवळील बाजूस पायथ्याला अशाप्रकारे झाडे बहरली आहेत.