सचिन यादवकोल्हापूर : राज्यातील हिंद केसरी, महाराष्ट्र केसरींचे गेल्या सहा महिन्यांचे मानधन रखडले आहे. काही तांत्रिक कारणे आणि मार्चअखेर असल्याचे सांगून या ज्येष्ठ मल्लांचे मानधन थकविले आहे. राज्यात पाच हिंद केसरींसह २० हून अधिक महाराष्ट्र केसरी आहेत. त्यांच्या मागणीला राज्याचे क्रीडा खातेही दाद देत नसल्याचे चित्र आहे.
कुस्ती आणि कोल्हापूरचे अतूट नाते आहे. एकेकाळी कुस्तीच्या मैदानात कोल्हापूरसह पुणे, सांगली, नगर या शहरांचा दबदबा राज्यात होता. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी मल्लांचा मोठा सन्मान केला जात होता. सरकारने ५० वर्षांच्या पुढील ज्येष्ठ मल्लांना मानधन देण्याची घोषणा केली. मात्र, कालांतराने सरकार बदलत गेले. त्यानुसार त्या-त्या सरकारच्या काळात निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली नाही.दर महिन्याला थेट त्यांच्या बॅंक खात्यावर मानधन जमा होत होते. तर, काही वेळाला त्यांच्या हाती धनादेश दिला जात होता. सध्या कधी चार महिने, सहा महिने तर, कधी-कधी वर्षभर मानधन जमा केले जात नाही. आयुष्यातील उमेदीची वर्षे कुस्तीमध्ये घालविलेल्या मल्लांना आता मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
सहा हजारांचे मानधनहिंद केसरी, महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांना राज्य सरकार प्रतिमहिना ६ हजार रुपये मानधन देते. सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने यावरच निर्वाह असलेल्या मल्लांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. औषधोपचारांचा खर्च, योग्य आहार मिळाला नसल्याने अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे.
किमान ७ तारखेपर्यंत मानधन द्यामिळणारे मानधन दर महिन्याच्या किमान १ ते ७ तारखेपर्यंत खात्यावर जमा व्हावे. अशी सर्वसाधारण अपेक्षा मल्लांकडून व्यक्त होत आहे. मात्र त्यांच्या मागणीला राज्याच्या क्रीडा खात्याकडून दाद मिळत नाही.
कधीही वेळेवर मानधन मिळत नाही. विचारणा केल्यास सरकारी उत्तरे ज्येष्ठ मल्लांना दिली जातात. मानधन वाढीच्या मागणीलाही क्रीडा खात्याने केराची टोपली दाखविली आहे. वारंवार पत्रव्यवहार, विनंती अर्ज करूनही काही उपयोग होत नाही. -दीनानाथ सिंह, हिंद केसरी
मार्चअखेरच्या कामामुळे अद्याप काही बिले आलेली नाहीत. प्रलंबित बिलासाठी पाठपुरावा सुरू आहे. टप्प्याटप्याने अनेक प्रकारच्या मानधनाची बिले जमा होत आहेत. - निलिमा अडसूळ, जिल्हा क्रीडा अधिकारी