कोल्हापूर : लाल माती गाजविणाऱ्या हिंदकेसरी व ज्येष्ठ मल्ल व त्यांच्या पश्चात विधवा पत्नींना राज्य शासनाकडून मिळणारे मानधन गेले सात महिन्यांपासून रखडले आहे. मानधनासाठी वारंवार क्रीडा कार्यालयाकडे विनंत्या करण्यापेक्षा मेलेले बरे. आमच्या मरणाची सरकार वाट पाहतंय का, असा सवाल आता ही ज्येष्ठ मल्ल मंडळी विचारू लागली आहेत.हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्ल म्हटले की, राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असो त्यातील मंत्रिमहोदय त्यांचा सन्मान केला जात होता. वेळच्या वेळी ज्येष्ठ झालेल्या मल्लांचे मानधन त्यांच्या खात्यावर जमा होत असे. कालांतराने सरकार बदलत गेले आणि मल्लांचे दिवसही पालटत गेले. महिन्याकाठी थेट बँक खात्यावर जमा होणारे मानधन कधी वर्षभर, तर कधी चार महिने, सहा महिने जमा होईनासे झाले आहे. या ज्येष्ठ मल्ल मंडळी व त्यांच्या विधवा पत्नींना सरकारकडून सहा हजार रुपये मानधन म्हणून दिले जाते. तेही आता सात महिन्यांपासून रखडले आहे. या ज्येष्ठ मंडळींनी त्यांच्या तरुण काळात जबरदस्त व्यायाम केल्याने त्यांना आता व्याधींनी ग्रासले आहे. उतारवयात या मानधनातून औषधोपचाराचा खर्च भागतो. पण तोही आता हाती मिळताना क्रीडा खात्याला विनंत्या कराव्या लागत आहेत. बिकट परिस्थितीत औषधोपचाराचा तरी खर्च भागावा म्हणून क्रीडा खाते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तरी त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी या मल्लांकडून होत आहे.
फडणवीस यांची घोषणा अजूनही हवेतचपुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील बक्षीस समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ मल्लांचे मानधन आताच्या मानधनाच्या तिप्पट करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही यात एक पैसाही वाढ झालेली नाही आणि आहे तेही लवकर हातात मिळेनासे झाले आहे.
आमच्या हयातीतच मानधन महिन्याच्या महिन्याला थेट बँकेत जमा होऊ दे. सरकार काय आमच्या मरणाची वाट बघतंय का? आमची लाल माती प्रतिसेवा सरकार विसरून गेलंय का? - हिंदकेसरी दिनानाथसिंह
सध्या जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा प्रभाराबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून दिलेला नाही. याबाबतची माहिती घेऊन हे मानधन त्वरित काढण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करू. - माणिक वाघमारे, क्रीडा उपसंचालक, कोल्हापूर विभाग