कोल्हापूर : कॉँग्रेसने पूर्वीपासूनच ‘मुस्लिम खतरे में है’ अशी दिशाभूल करत हिंदू-मुस्लिम अशी तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे, असा आरोप भाजप अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी सोमवारी येथे केला. ‘अच्छे दिन’ कुठे आहेत? अशी विचारणा करणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावरही जोरदार हल्ला चढवत भ्रष्टाचारामध्ये त्यांची पिल्ली जेलमध्ये जात आहेत. हे ‘अच्छे दिन’ नाहीत का? अशी विचारणाही त्यांनी केली.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे भाजप अल्पसंख्याक आघाडीतर्फेे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती आघाडीचे प्रदेश महामंत्री इम्रान मुजावर, एजाज देशमुख, सिकंदर शेख, सचिव अॅड. तबस्सूम बैरागदार, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, अल्पसंख्याक आघाडी महानगर जिल्हाध्यक्ष नझीर देसाई, ग्रामीण जिल्हाध्यक्ष झाकीर जमादार यांची होती.जमाल सिद्दिकी म्हणाले, ‘अच्छे दिन’ कुठे आहेत? अशी विचारणा करणाऱ्या शरद पवारांना भ्रष्टाचारप्रकरणी त्यांची पिल्ली जेलमध्ये जात आहेत. हे ‘अच्छे दिन’ दिसत नाहीत का? सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुरू असलेली ‘सीआडी’ चौकशी व कॉँग्रेस आघाडीच्या काळात बेकायदेशीररीत्या बांधलेली आदर्श इमारत पाडण्याचे दिलेले आदेश हे ‘अच्छे दिनच’ आहेत. कॉँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेची दिशाभूल थांबवावी.एजाज देशमुख म्हणाले, मुस्लिमांनी ६० वर्षे कॉँग्रेसला मते दिली; परंतु त्यांनी त्या बदल्यात समाजाला गरिबी, भूखमरी, बेरोजगारीच दिली. सिकंदर शेख म्हणाले, अल्पसंख्याक समाज भाजपशी जोडला जावा, यासाठी पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. इम्रान मुजावर म्हणाले, भाजपमध्ये जाती-धर्मावरून दुजाभाव केला जात नाही. हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे.संदीप देसाई म्हणाले, गेल्या ६0 वर्र्षात कॉँग्रेसने मुस्लिमांना शिक्षणापासून वंचित ठेवले. महेश जाधव म्हणाले, भाजप हा जातीयवादी पक्ष असल्याची कॉँग्रेसने घातलेली भीती नाहक आहे. अॅड. तबस्सुम बैरागदार यांनी विविध योजनांची माहिती दिली. हेमंत आराध्ये यांनी सूत्रसंचालन, तौफिक बागवान यांनी आभार मानले. अशोक देसाई, विजय जाधव, मुश्ताक पठाण, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
काँग्रेसमुळेच हिंदू-मुस्लिम तेढ
By admin | Published: May 17, 2016 12:48 AM