कोल्हापूर : भाजप शिवसेनेने युती करताना राज्याच्या विकासाचा मुद्दा मांडला नाही, गरीबाविषयीचा विचार मांडला नाही. तर हिंदुत्वाचा धागा आमच्यामध्ये समान असल्याचे सांगितले. राज्याच्या विकासापेक्षा हिंदूत्व मोठे मानणाऱ्यां प्रवृत्तींविरोधात आता लढाई लढण्याची गरज असल्याचा निर्धार करा असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पवार यांनी शनिवारी सकाळी आघाडीच्या नेत्यांची आणि उमेदवारांची बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणामध्ये आपली ही भूमिका मांडली.पवार म्हणाले, राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती झाल्याचे नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. परंतू आम्ही सर्व जातीधर्मांचा आदर करणारी मंडळी आहोत. एकाचाच विचार करण्याची संकल्पना आमची नाही. परंतू कधी नव्हे ते राज्यभरातील तरूण पीढीकडून आपल्याला चांगले पाठबळ मिळत आहे.
सामाजिक अंतर वाढवणाऱ्या प्रवृतींना थोपवण्यासाठी आता निर्धाराने लढाईला उतरावे लागेल. यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यासह, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकारी आणि आघाडीचे उमेदवार उपस्थित होते.