इचलकरंजी : हेरले (ता. हातकणंगले) येथील घटनेच्या निषेधार्थ तसेच जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून हिंदूंच्या जनभावना दुखावल्या जात आहेत; याविरोधात मंगळवारी येथील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर जमावाने रस्त्यावर सुरू ठेवलेले हातगाडे उलटे करीत आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जमाव गटागटाने फिरू लागल्याने मुख्य मार्गावरील व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारपर्यंत शहरात बंदसदृश स्थिती होती. दुपारनंतर तणाव हळूहळू निवळला.शहर परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते हातात भगवे ध्वज घेऊन मंगळवारी सकाळी मलाबादे चौकात जमले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष तसेच विविध घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला. प्रमुख मार्गांवरून मोर्चा महात्मा गांधी पुतळा चौकात आला. त्या ठिकाणीही सुमारे अर्धा तास जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मोर्चा अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे गेला. तेथे शिष्टमंडळाच्या वतीने अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यामध्ये हेरले येथील प्रकरणाचा सखोल तपास करावा, धर्मांधांकडून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. देशद्रोही घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, असे प्रकार पोलिसांनी रोखावेत. तसेच हेरले येथील अनधिकृत प्रार्थनास्थळ जमीनदोस्त करावे, लव्ह जिहाद, लँड जिहाद यासारख्या प्रकारांमुळे हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी षड्यंत्र रचले जात असल्याने प्रार्थनास्थळ आणि मौलवींची चौकशी करावी, धर्मांध संघटनांची चौकशी करावी यांसह मोर्चाच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या. खाटमोडे-पाटील यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच शांततेचे आवाहन केले. त्यानंतर गजानन महाजन-गुरुजी यांच्या आवाहनानंतर मोर्चाची सांगता झाली.मोर्चानंतर जमाव मुख्य मार्गांवरून शिवतीर्थाच्या दिशेने जात होता. आक्रमक झालेला जमाव नारायण पेठ येथे आल्यानंतर तेथील काही फळविक्रेत्यांचे हातगाडे सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने जमावाने फळविक्रीचा गाडा उलटवला. त्यामुळे इतर व्यापाऱ्यांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी तिथून जमाव पांगवला. मात्र, पुन्हा मलाबादे चौकात जमाव जमला. त्या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रमुखांनी शांततेचे आवाहन केले.जमाव पुन्हा शिवतीर्थकडे निघाला. त्यावेळी एक सेल सुरू असल्यामुळे त्याचा डिजिटल फलक फाडण्यात आला. त्यानंतर शिवतीर्थावर प्रेरणामंत्र झाला. त्यानंतर आवाहन करूनही जमाव पुन्हा महात्मा गांधी पुतळा चौकाकडे परतला. तेथे रस्त्यावर सुरू ठेवलेले हातगाडे उलटे केले, साहित्य विस्कटून संताप व्यक्त केला.या घटनेमुळे शहरात विशेषत: मुख्य बाजारपेठेत मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांची मोठी धावपळ उडाली. राजवाडा, नदीवेस नाका, आझाद चित्रमंदिर परिसर, आदी ठिकाणी गटागटाने फिरून काही कार्यकर्त्यांकडून बंदचे आवाहन करण्यात येत होते. दुपारनंतर शहरात तणाव निवळल्याचे दिसून आले. मात्र, ठिकठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.सोशल मीडियावरील बंदच्या आवाहनामुळे गोंधळशहरात हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, बंदचे आवाहन केले नव्हते; परंतु सकाळपासूनच मुख्य मार्गासह काही भागांत स्वयंस्फूर्तीने व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवले होते. तसेच एस. टी. बस व रिक्षा वाहतूकही काही काळ बंद होती.मोर्चानंतर बंदमोर्चा संपल्यानंतर जमलेल्या जमावाने काही ठिकाणी गटागटाने फिरून बंदचे आवाहन केल्यामुळे भागातील व्यापाऱ्यांनीही व्यवसाय बंद ठेवणे पसंत केले. दुपारपर्यंत शहरात बंदसदृश परिस्थिती होती. पोलिसांकडूनही भागाभागांत फिरून गस्त घालण्यात येत होती.मदतीचा हातमहात्मा गांधी पुतळ्याच्या परिसरात हातगाडी उलटविल्याने रस्त्यावर पडलेले लिंबू, केळी, नारळ, आदी साहित्य गोळा करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी मदत केली.
कोल्हापुरातील इचलकरंजीत हिंदुत्ववाद्यांचा मोर्चा, फळविक्रेत्यांचे हातगाडे उलटवले; तणावाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 3:46 PM