कोल्हापूर : बुद्धीदाता, विघ्नविनाशक मंगलमूर्ती श्री गणेशाला शनिवारी कोल्हापुरकरांनी जडअंत:करणाने निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी हाक देताना जलप्रदुषण टाळणारे पुरोगामी, पर्यावरणप्रेमी आणि सजग कोल्हापुरकर असल्याची प्रचिती देत शहरासह जिल्हयातील भाविकांनी आपल्या मूर्तीचे पर्यावरणपुरक विसर्जन केले. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातून ३ लाखांहून अधिक मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन झाले. मात्र हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यानी बॅरिकेडस तोडून पंचगंगेतच मूर्ती विसर्जित केल्या.करवीरवासियांची जीवनदायिनी असलेली पंचगंगा, रंकाळा, कळंबा, राजाराम तलाव सह जिल्ह्यातील नद्या व जलाशयांमध्ये क्वचित वगळता मूर्तींचे विसर्जन झाले नाही. गेल्या पाच दिवसांपासून भक्तांच्या आयुष्यात आनंद, मांगल्य, सुख समृद्धीचे दान टाकत त्यांचा पाहूणचार घेतलेल्या घरगुती गणपती बाप्पांना निरोप देण्याचा क्षण आला. वर्षभर वाट पाहिल्यानंतर फक्त पाच दिवसांचा पाहुणा म्हणून आलेल्या देवाला निरोप देताना प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. पण विद्येची देवता असलेल्या बाप्पांना निरोप देतानाही पर्यावरणाचे व जलप्रदुषण टाळण्याचे भान राखत कोल्हापुरकरांनी विसर्जन कुंडात मूर्तीचे विसर्जन केले.
कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी बॅरिकेडस तोडून पंचगंगेत विसर्जित केल्या गणेशमूर्तीं video
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 23, 2023 7:21 PM