आयुब मुल्ला-खोची --मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या विक्राळ पुरामुळे जम्मू काश्मिरमध्ये हाहाकार माजला होता, अशा परिस्थितीत अॅडमिशन घेण्यासाठी घराबाहेर पडलेला विद्यार्थी शेकडो किलोमीटर दूर श्रीनगरमध्ये अडकला. घरच्यांचा संपर्क तुटला. अॅडमिशन तर झाले. पण, घरी परतणार कसे? हा प्रश्न त्याच्यासमोर होता. अखेर गावाची ओढ असतानासुद्धा ‘पढाई के आगे दिल क्या करेगा’ असे म्हणत त्याने आपलं मन घट्ट केलं. अनेक प्रसंगांना सामोरे जात तो कोल्हापूर जिल्ह्यातील अशोकराव माने ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशनमध्ये शिकण्यासाठी दाखल झाला. वीरेंद्रप्रतापसिंग चैनसिंग (चप्पाहारी, ता. चेनहानी, जि. उधमपूर) याला सिव्हिल अभियांत्रिकीसाठी प्रवेश हवा होता. त्यासाठी तो एआयसीटीईच्या कौन्सलिंग राऊंडला श्रीनगरमध्ये आला. माने इन्स्टिट्युटची सर्व माहिती उच्चशिक्षित स्टाफ यांची सविस्तर माहिती त्याने वेबसाईटवर बघितली अन् निवड केली. त्यानुसार त्याचा या राऊंडला प्रवेश निश्चित झाला. विशेष शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत प्रवेश न झाल्याने सात दिवसांच्या आत सदर कॉलेजमध्ये हजर होऊन प्रवेश अंतिम करणे गरजेचे होते. त्यानुसार तो पोहोचला आणि प्रवेश घेतला. परंतु, त्याचा यासाठी झालेला प्रवास हा अनंत अडचणींना पार करणारा ठरला. ज्यावेळी तो कौन्सिलिंग राऊंडला बाहेर पडला त्यावेळी त्याच्याजवळ थोडे पैसे व कागदपत्रे होती. परंतु, पावसाचे थैमान, पूरस्थिती, अशी भयानक परिस्थिती निर्मााण होईल, असा विचार देखील त्याच्यासमोर नव्हता; पण प्रवेश निश्चित झाल्यानंतर मात्र त्याच्यासमोर घरी जायला सुद्धा पर्याय नव्हता. सर्व रस्ते बंद होते, अशा परिस्थितीत शिक्षणासाठी महाराष्ट्रात येणारा हा विद्यार्थी चिंतेत होता. गव्हर्नर कार्यालयाजवळील हेलिपॅडवर बिस्कीट, बटाटा खाऊन तीन दिवस काढले. चौथ्या दिवशी श्रीनगर एअरपोर्टवर पोहोचला. तेथून लष्करी विमानाने जम्मू विमानतळावर आला. त्यानंतर विमानाने तो दिल्ली व तेथून पुणे येथे आला. वाठार तर्फे वडगाव येथील माने इन्स्टिटयुटमध्ये पोहोचला. रीतसर प्रवेश घेतला. संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, कार्यकारी संचालक डॉ. दीपक मुदगल यांनी त्याचा थक्क करणारा प्रवास ऐकून आपुलकीने मदत केली. दरम्यानच्या काळात त्याचा घरच्यांबरोबर फोनवरून संपर्क झाला. ‘पढाई के लिए मै महाराष्ट्र में पहुँचा हूँ, मै ठिक हूॅँ. अपना खयाल रखना’ असा एवढा भावनिक व आधार देणारे शब्द तो बोलला. आता तो येथील विद्यार्थ्यांमध्ये रमला आहे; परंतु त्याच्या चेहऱ्यावर मात्र, गावच्या परिस्थितीची ओढ दिसून येते.
शिक्षणासाठी त्याचा अनंत अडचणींचा प्रवास
By admin | Published: September 20, 2014 12:11 AM