मुरलीधर कुलकर्णी -- कोल्हापूर -बॉक्सिंगमधील त्याची प्रगती खरोखर नेत्रदीपक अशीच आहे. वयाच्या अवघ्या २0 व्या वर्षीच तो आॅल इंडिया बॉक्सिंग असोसिएशनची ‘सीसीसीपी’ परीक्षा उत्तीर्ण झालाय. संपूर्ण जिल्ह्यातील अशा प्रकारचे यश मिळविणाऱ्या अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या लोकांच्या यादीत त्याने मानाचे स्थान पटकावले आहे. परंतु, घरची गरिबी त्याला पुढे जाऊ देत नाही. सरावासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी त्याला आजही धडपडावं लागतंय. मुलाच्या खर्चासाठी महापालिकेत झाडू कामगार म्हणून काम करणाऱ्या त्याच्या वडिलांना कर्जाचा आधार घ्यावा लागतोय. ही कहाणी आहे मयूर सांगेला या युवकाची.मयूरला बॉक्स्ािंगची आवड शाळेतून निर्माण झाली. दररोज तो गांधी मैदान येथील बॉक्सिंग रिंगमध्ये सराव करू लागला. दहावीपर्यंत त्याने शालेय स्तरापासून राज्यस्तरावरच्या स्पर्धांत नेत्रदीपक कामगिरी केली. सध्या तो छत्रपती शहाजी महाविद्यालयात शिकतोय. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनने कोरेगाव येथे २0१२ साली घेतलेल्या स्पर्धेत त्याला ‘बेस्ट बॉक्सर’चा बहुमान मिळाला असून, १५ डिसेंबर २0१३ रोजी भुसावळ येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही तो अव्वल ठरला आहे. आॅल इंडिया बॉक्सिंग असोसिएशनतर्फे ४ मे २0१४ रोजी शिवाजी पार्क, मुंबई येथे घेतलेल्या लेव्हल १ पंच परीक्षेत (सीसीसीपी) तो उत्तीर्ण झाला आहे. विभागीय, तसेच राज्यस्तरावरच्या अनेक स्पर्धांमध्ये सध्या तो पंच म्हणून काम पाहतोय. इतके सारे असूनही शासनाकडून सध्यातरी त्याला कसलीच मदत मिळत नाही. साहित्य, प्रवासखर्च यासाठी तो एका खासगी दुकानात सेल्समन म्हणून काम करतोय. राष्ट्रीय पंच म्हणून काम करण्याचे त्याचे स्वप्न आहे. यासाठी त्याचा सरावही जोरात सुरू आहे; परंतु, शासनाच्या मदतीशिवाय त्याला ही कामगिरी करणे शक्य नाही.
त्याच्या ‘पंच’ना हवय बळ...
By admin | Published: January 02, 2016 8:29 AM