शिवाजी सावंत।गारगोटी : इतिहासाबरोबर नैसर्गिकदृष्ट्याही तितकेच महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची पर्यटकांना भुरळ आहे. भुदरगड तालुक्यातील ऐतिहासिक गडकोट, तीन संतांच्या संजीवन समाधी, मडीलगे खुर्द येथील डोंगरमाथ्यावरील जोतिबा ही पर्यटनासाठी उत्तम आणि सुरक्षित स्थळे आहेत. तर ट्रेकिंग हौशींसाठी अनेक डोंगरदºया साद घालत आहेत. याशिवाय ज्या गडावर चारचाकी वाहनाने जाता येते, असा गडकोट भुदरगड आहे.
गडकोटांचा राजा दुसरा राजा भोज यांनी पंधरा गडकोटांची निर्मिती केली. त्यातील रांगणा आणि भुदरगड हे दोन गडकोट भुदरगड तालुक्यात आहेत. तालुक्याच्या पश्चिमेला रांगणागड, तर पूवेर्ला भुदरगड असे दोन गड आहेत.
ज्या गडांच्या नावावरून तालुक्याला नामाभिधान लाभले तो भुदरगड किल्ला हा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला गड आहे. मराठा शाही, मुघल, इंग्रज अशा अनेक राजांची कारकीर्द पाहिलेला हा गड इंग्रजांच्या विरोधात देशातील सर्वांत पहिला लढा म्हणजे तात्या टोपेंच्या लढ्याच्या १३ वर्षे अगोदर या गडावरील सामान्य गडकऱ्यांनी लढलेले लढा आहे. यामध्ये इंग्रजांना तीन महिने हा गड जिंकता आला नव्हता. सामान्य गडकºयांनी लढलेली ही लढाई इतिहासात प्रथमच वेगळी लढाई म्हणून नोंदली गेली.
समुद्रसपाटीपासून ९७८ मीटर उंचीवर बेसाल्ट जातीच्या एकाच खडकावर हा किल्ला बांधलेला आहे. या गडाच्या भिंती चिरा दगडात बांधलेल्या आहेत. जेथून चिरा काढला गेला येथे १४ हेक्टर क्षेत्रांत मोठे तलाव निर्माण झाले आहेत. देशात एवढे मोठे तलाव कोठेही पाहावयास मिळत नाहीत. बेसाल्ट खडकावर कधीही पाणी साचून राहत नाही; पण या गडावरील या तलावात बारमाही पाणी असते.
ऐतिहासिक वारसा असलेल्या या गडाच्या सभोवताली दुर्मीळ वनौषधी सापडतात. गारगोटी शहरापासून अवघ्या दहा कि.मी. अंतरावर हा गड आहे. या गडावर जाण्यासाठी पक्की सडक असल्याने वर्षातील बारा महिने कधीही येथे जाता येते. गडावर भैरवनाथ, महादेव मंदिर, दोन विहिरी, तर मुस्लिम राजवटीतील गोल घुमट असलेले मंदिर पाहता येते. या गडावर पुष्पनगर मार्गे जाता येते. याखेरीज पाल मार्गे देखील जाता येते.तालुक्यात लक्षवेधी प्रेक्षणीय स्थळेगारगोटी येथील मुळे महाराज, आदमापूर येथील संत बाळूमामा, शेणगाव येथील फातिमा चर्च, मडीलगे खुर्द येथील डोंगरावरील जोतिबा मंदिर ,पाल येथील गुहा, अशा प्रकारच्या अनेक प्रेक्षणीयस्थळांना भेटी देता येतील. जिल्ह्यातील पर्यटनप्रेमींना भुदरगड तालुक्यातील पर्यटनस्थळे खुणावत आहेत. यंदाच्या सुट्टीतील पर्यटनासाठी स्वस्त पर्यटन म्हणून या तालुक्याला पसंती दिल्यास निश्चितच मनाला समाधान लाभेल. ठिकठिकाणी नव्याने सुरू झालेल्या फार्म हाऊसवर आपण एकदिवस वस्ती करू शकता. याशिवाय तालुक्यातील बेडीव येथील म्हातारीचा पठार, मिणचे येथील ८00 मीटर उंचीवरील बसुदेवाचे पठार, भटवाडी आडे गावातील बुद्धकालीन सिद्धगुहा, नवले येथील राईचा झरा, अशी अनेक स्थळे आपण पाहू शकता.