संजय पारकर ।राधानगरी : राजर्षी शाहू महाराजांच्या कर्तृत्वाची ओळख असलेल्या हत्तीमहाल (ता. राधानगरी) येथील साठमारी व अन्य परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होणार आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून येथील कामासाठी ६० लाख १० हजार रुपये खर्चाच्या आराखड्यास मंजुरी दिली.२०१८-१९ या आर्थिक वर्षात यापैकी सहा लाख रुपये वितरित केले आहेत. या वास्तूचे जतन व्हावे, अशी तालुक्यातील जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यामुळे राधानगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
शाहू महाराजांच्या पदस्पर्शाच्या व कर्तृत्वाच्या अनेक खुणा या परिसरात जागोजागी आढळतात. राधानगरी धरण, अभयारण्य, राधानगरी शहर ही त्यातील काही उदाहरणे आहेत. सतत या परिसरात त्यांचा वावर असायचा. दाजीपूर राखीव जंगलात होणाऱ्या शिकारी, अस्वलांबरोबर झालेली त्यांची झटापट यांसारख्या अनेक आठवणींना वारंवार उजाळा मिळतो.
याच काळात महाराजांनी राधानगरीहून धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यापासून काही अंतरावर हत्तींच्या खेळासाठी साठमारी उभारली होती. कोल्हापूर शहरातही अशी साठमारी आहे. या ठिकाणी हत्तींचे साहसी खेळ होत असत. काळाच्या ओघात ही साठमारी उद्ध्वस्त झाली. मात्र, हत्तींना ठेवण्यासाठी असलेली हत्तीमहाल इमारत अजूनही अस्तित्वात आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी उभारलेला हत्तीमहाल आता जीर्ण झाला आहे. चारी बाजूला भक्कम बांधकाम व मधोमध मोकळी जागा असून, मोठ्या कमानीचे प्रवेशद्वार आहे. संपूर्ण इमारत दुमजली होती. सागवानी रूपकाम व त्यावर लोखंडी पत्रा होता. सध्या छताची दुरवस्था झाली आहे. तळ मजल्याचे बांधकाम भक्कम आहे.
परिसरातील काही तरुण मंडळे, सेवाभावी संस्था येथे पावसाळ्यानंतर स्वच्छता व साफसफाई करीत असत. या परिसराची सुधारणा करून पर्यटनस्थळ करावे, अशी मागणी होत होती. त्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रयत्न केल्यानंतर हा आराखडा मंजूर झाला.पर्यटकांची वर्दळ वाढणारधरणस्थळी साकारत असलेले शाहू महाराजांचे स्मारक, काही चौकांचे सुशोभीकरण, अभयारण्यातील सुधारणा व सुविधा, अशी कामे होत असल्याने या परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. याचा फायदा स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी होणार आहे.