युनूस शेख --इस्लामपूर --एम. डी. पवार शहराचे अनभिषिक्त सम्राट. त्यांचा थाट-माट अन् रुबाब वेगळाच. ‘मला पाडणारा जन्माला यायचाय. मी मरेपर्यंत नगराध्यक्ष राहणार आणि नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीतच मरणार..’ हा त्यांचा आणखी मोठा दर्प. याला वैतागलेली पाटील मंडळी सत्तांतराच्या ईर्षेने पेटलेली. मग साम, दाम, दंड, भेदाच्या नीतीबरोबरच, पैशाशिवाय काही चालत नाही अन् पैसा मागूनही मिळत नाही, अशा कानमंत्रातून १९८५ चे ऐतिहासिक सत्तांतर घडले.अण्णासाहेब डांगे हेही कोपीष्ट, पण जिगरबाज व्यक्तिमत्त्व, पाटील पार्टीतीलच. १९५७ मध्ये त्यांनी पक्षविरहित नागरिक संघटनेची स्थापना केली होती. मात्र तरीही १९६२ पर्यंत पवार पार्टी विरुध्द पाटील पार्टी असाच सामना रंगायचा. १९६२ मध्ये पाटील पार्टी नागरिक संघटनेत विलीन झाली. त्यानंतर ही सर्वपक्षीय आघाडी विरुध्द पवार पार्टी अशा लढती रंगू लागल्या. या लढतींवर पवारांचेच वर्चस्व असायचे.अण्णासाहेब चाणाक्ष. त्यांनी हिं. पा. गुरुजी व बाबूराव अण्णा अशा दोघांना कोरेआप्पांकडे धाडले. दोघांनी आप्पांची भेट घेतली. मात्र आप्पांनी तेवढा जोरकस प्रतिसाद दिला नाही. यादरम्यान प्रा. शामराव पाटील, विजयभाऊ पाटील, अशोकदादा पाटील असे तिघे डांगेंच्या परवानगीने नुकतेच राजकारणात आलेल्या जयंत पाटील यांना भेटायला गेले. मात्र सार्वजनिक जीवनात नवखे असलेल्या जयंतरावांनी पवारांशी पंगा घेण्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिघेही परतले.यादरम्यान डांगे स्वत: कोरेआप्पांना भेटायला क्रशरवर गेले. अण्णांनी संपूर्ण जबाबदारी घेतली. आप्पांनी होकार दिला. धनाढ्य म्होरक्या शोधण्याची मोहीम यशस्वी झाली होती.इकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना, तिकडे एम. डी. पवार साहेबांपुढे सगळे फासे उलटे पडत चालले होते. त्यांना चारही बाजूने घेरण्यात विरोधक यशस्वी झाले होते. डांगेंच्या नेतृत्वाखालील नागरिक संघटनेने उमेदवार शोधमोहीम राबवली. अशोकदादा पाटील, विजयभाऊ पाटील, आर. वाय. पाटील, डॉ. धनंजय परदेशी, अॅड. सुधीर पिसे, अॅड. अशोक वाळिंबे, सुंदरलाल शहा, आनंदराव मलगुंडे, भगवान पाटील, दिलावर पटवेकर असे एकापेक्षा एक उमेदवार मिळविले. विरोधात उभे राहणारांना पवारांच्याच स्टाईलने परस्पर दमबाजी करीत थांबविले जात होते. त्यातच पवारांच्या गोटातील बिनीचे शिलेदार नागरिक संघटनेत दाखल होत होते. निवडणूक लागली. नागरिक संघटनेकडून, ‘सत्तापरिवर्तन’ एवढीच नशा डोक्यात ठेवून जोरदार लढतीची तयारी झाली होती. पवारसाहेब स्वत: दोन प्रभागातून लढत होते. उरुणमधील प्रभागात त्यांच्याच ताटात जेवलेल्या शामराव खांबेंनी, तर शहरातील प्रभागात डॉ. धनंजय परदेशी यांनी पवार साहेबांचा पराभव केला. नागरिक संघटनेचा घोडा ३१ पैकी २९ जागांवर चौखूर उधळला, तर नांगरे-पाटील भावकीचा विरोध पत्करुन बंडखोरी केलेले बबन अनंत ऊर्फ बी. ए. पाटील यांनी ‘हत्ती’ची चाल या वादळातही कायम ठेवली. या ऐतिहासिक सत्तांतरात भीमराव शामराव जाधव यांच्यारूपाने पवारांनी एकमेव जागा राखली. या सत्तांतरानंतर काही काळातच एम. डी. पवार साहेबांचे निधन झाले. मात्र आजही ते शहरात दंतकथा बनून राहिले आहेत.विविध निकषांचा सारीपाट मांडला...अण्णासाहेब डांगे यांच्या डोक्यात मात्र इस्लामपूर पालिका सत्तापरिवर्तनाची गणिते घोळायची.एम. डी. पवार यांच्या पैशाला पैसा आणि दमाला दम देणारा, निवडून येण्याची क्षमता आणि सोबतीला माणूसबळ असणारा उमेदवार असावा, अशा निकषांचा सारीपाट मांडला गेला. या सारीपाटाला म्होरक्या हवा होता. तशी शोधमोहीमही सुरु होती. कोरेआप्पांच्या रुपाने संघटनेला धनवान म्होरक्या मिळाला. त्यानंतर इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीला रंग भरु लागला.
इस्लामपुरात १९८५ ला घडले ऐतिहासिक सत्तांतर
By admin | Published: November 05, 2016 11:44 PM