रुकडी माणगाव : माणगाव परिषदेमुळे भारताचा इतिहास बदलला आहे. परिषदेमुळे सर्व समाजांचा चेहरामोहरा बदलल्याचे आपण सर्व जण साक्षीदार आहोत. व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. माणगाव येथे माणगाव परिषदेच्या शताब्दी महोत्सव सांगता समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शाहू महाराज होते.डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सध्या समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याची गरज असून त्यांना सेवा संस्था, पतसंस्था या माध्यमातून मदत केली पाहिजे. आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांची लढाई लढायचे आहे. आपली बांधीलकी विचारांशी असली पाहिजे.छत्रपती शाहू महाराज म्हणाले, सर्व समाज एक समान बनवायचे असेल व समतावाद प्रस्थापित करायचे असेल तर आंबेडकर यांचा विचार सर्वांनी जोपासला पाहिजे. प्रकाश आंबेडकर हे योग्य दिशा व मार्ग दाखवतील. समाजामध्ये वंचित असणाऱ्या घटकांना एकत्रित येणे आवश्यक आहे.
याप्रसंगी माजी प्राचार्य बापूसाहेब माने, अंजली आंबेडकर यांनी विचार व्यक्त केले. शाहू महाराजांचे वंशज श्रीमंत छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज ॲड. प्रकाश आंबेडकर, तत्कालीन परिषदेची संपूर्ण जबाबदारी पार पाडणारे अप्पासाहेब पाटील यांचे वंशज विक्रमसिंह ऊर्फ राजू पाटील या तिन्ही घराण्यांतील वंशजांचा यावेळी सन्मान करण्यात आला. इचलकरंजी बार असोसिएशनच्या सचिवपदी ॲड. राजू शिंगे यांची निवड झाल्याबद्दल ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. समारंभाचे निमंत्रक प्राचार्य बापूसाहेब माने यांनी उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा दिली. छत्रपती शाहू महाराज व ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रतिज्ञा घेतली.
माणगाव परिषदेचे शतकोत्तर चिंतन, अप्पासाहेब पाटील व्यर्थ ना हो बलिदान, क्रांतीचे साक्षीदार या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवर यांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक अंबपकर यांनी केले, तर आभार व्ही. पी. कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन समीर माने यांनी व्यक्त केले.
समारंभास मुरलीधर कांबळे, अनिल कांबळे, मधुकर माणगावकर, डॉ. संभाजी बी राजे, भीमराव माणगावकर, एस. आर. गवळी, आदी उपस्थित होते. या समारंभास कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते.
पावसाचा असाही योगायोग.....माणगाव येथे १९२० साली झालेल्या परिषदेत राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अप्पासाहेब पाटील उपस्थित होते. त्यावेळी देखील जोरदार पाऊस झाला होता. शतकोत्तर सांगता समारंभास राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज ॲड. प्रकाश आंबेडकर व अप्पासाहेब पाटील यांचे वंशज विक्रमसिंह पाटील यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमास देखील पावसाने हजेरी लावली. कार्यक्रमस्थळी या योगायोगाची चर्चा होती.