कोल्हापूर : शाहू महाराजांची पुण्याई लाभलेल्या कोल्हापूरने स्वातंत्र्य चळवळ, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कला, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांत परिपूर्ण योगदान दिले आहे. या शहराला लाभलेल्या व्यक्तित्त्वांनी ही भूमी समृद्ध केली. आज, मंगळवारी प्रकाशित झालेल्या नऊ चरित्रग्रंथातून कोल्हापूरच्या या परिपूर्ण इतिहासाची मांडणी केली आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो.मा. पवार यांनी व्यक्त केले. शाहू स्मारक भवनमध्ये श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित चरित्र ग्रंथांच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे होते. यावेळी आण्णासाहेब लठ्ठे, छत्रपती राजारम महाराज, कलामहर्षी बाबूराव पेंटर, सत्यशोधक केशवराव विचारे, लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात, क्रांतिवीर देशभक्त डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार, उद्योगपती वाय. पी. पोवार व इतर उद्योगपती, विमलाबाई बागल, आचार्य शांताराम गरुड या नऊ चरित्र ग्रंथांचे प्रकाशन झाले. पवार म्हणाले, कोल्हापूर हे सामाजिकदृष्ट्या पुरोगामी, राजकीयदृष्ट्या जागरूक आणि संवेदनशील, देशावर अतीव निष्ठा असणारे, वृत्तीने लढवय्ये, शोषितांसाठी कणव असलेले शहर आहे. या शहराने सांस्कृतिकदृष्ट्या गुणवत्तापूर्ण, सामाजिक सुधारणावादी, शिक्षणाचा प्रसार, बहुजन आणि स्त्री सुधारणा, कलेची अभिरुची आणि उद्योगांना चालना दिली आहे. येथे घडलेल्या अनेक व्यक्तिमत्त्वांनी या शहराला सर्वांगाने समृद्ध केले.गोविंद पानसरे म्हणाले, कोल्हापूरला लाभलेल्या थोर व्यक्तींच्या कार्याचा आताचे राजकारणी व नव्या पिढीला गंध नाही, कारण त्यांचे वाचन नाही. थोरांचे चरित्र नव्या पिढीला कळावे यासाठी चरित्रग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले आहे. आम्ही ग्रंथ प्रकाशनासाठी १३० व्यक्तींची नावे काढली आहेत. त्यापैकी आतापर्यंत फक्त २० जणांचे चरित्र आम्ही प्रकाशित करू शकलो आहोत. यावेळी लेखिका डॉ. पद्मजा पाटील, छाया पोवार, कविता गगराणी, विलास पोवार, अरुण शिंदे, आय. एच. पठाण, प्रसाद कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. विलास पोवार यांनी प्रास्ताविक केले. उमेश पानसरे यांनी आभार मानले.
कोल्हापूरच्या इतिहासाची चरित्रग्रंथांतून मांडणी
By admin | Published: September 17, 2014 12:48 AM