कोल्हापूर : मोर्चाची सुरुवात विविध ठिकाणांहून होईल. मात्र, ऐतिहासिक दसरा चौकामध्येच या मोर्चाची समाप्ती व्हावी. मोर्चा मार्गावर होणारा कचरा गोळा करण्यासाठी झाडू, टोपलीसह सहभागी होऊ, असा निश्चय मंगळवार पेठवासीयांनी केला. मंगळवार पेठवासीय सकल मराठा समाजबांधवांची मराठा क्रांती मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अजिंक्यदत्त हॉलमध्ये बैठक झाली. यावेळी मोठ्या संख्येने मोर्चासाठी येणारी लोकसंख्या लक्षात घेता मोर्चा मार्गावर अस्वच्छता निर्माण होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन मंगळवार पेठ वासीय मोर्चाच्या मागून जाणार आहेत. त्यात मार्गावर स्वच्छता करून कचरा गोळा केला जाणार आहे. शाहू महाराजांनी देशात प्रथम आरक्षण जाहीर केलेल्या दसरा चौकाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ताराराणी चौकात मोर्चा एकत्रित किंवा जमण्याचा प्रश्न नाही. ही बाब प्रशासनाने ध्यानात घ्यावी. मंगळवार पेठवासीय शिस्त पाळून सहकुटुंब या मोर्चात सहभागी होतील. मोर्चाचा मार्ग बदलून सरकार संख्याबळ कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. या पोलिस व प्रशासनाच्या भूमिकेस ठराव करून विरोध केला. हा ठराव मराठा क्रांती मूकमोर्चा समितीस सुपूर्द केला जाणार आहे. यावेळी बोलताना प्रणाली पार्टे म्हणाल्या, मोर्चातून शासनाला जरब बसावी अशा संख्येने सहभागी व्हा. मुळातच शाळांमधूनच मुलींना शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा. मोर्चात मंगळवारपेठवासीयांनी सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. वृषाली धर्मे म्हणाल्या,आरक्षण हे आम्हाला मिळायलाच हवे. अॅट्रॉसिटीसारख्या कायद्यात बदल करा. बलात्काऱ्यांना ७५ वर्षांची शिक्षा करा. तर प्रवीण राजिगरे यांनी महाराजांचा मावळा म्हणून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी एस. वाय. सरनाईक, बाळासाहेब निचिते, दीपक थोरात, अर्जुन नलवडे, विजयसिंह पाटील, प्रा. आनंद जरग, नितीन पायमल, रवींद्र पायमल, दीपक जाधव, अशोक पोवार, संभाजी जगदाळे, प्रा. दिलीप निंबाळकर, अमर दळवी, प्रज्ञा यादव, अनिल माळी, शरद पोवार, राजेंद्र नलवडे, अनुराधा घोरपडे, आदी मराठाबांधव सहभागी झाले होते.
ऐतिहासिक दसरा चौकातच मोर्चा समाप्त व्हावा
By admin | Published: October 08, 2016 1:22 AM