राम मगदूम।
गडहिंग्लज :
हिटणी नाक्यापासून गावापर्यंतच्या अडीच किलोमीटर रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून पायी चालणेदेखील मुश्कील झाले आहे. म्हणूनच या अप्रोच रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गडहिंग्लज-संकेश्वर मार्गावरील सुमारे ४ हजार लोकवस्तीचे गडहिंग्लज तालुक्यातील हे शेवटचे गाव आहे. गडहिंग्लज आगाराने या गावासाठी खास बसफेऱ्यादेखील सुरू केल्या आहेत. परंतु, दुरवस्थेमुळे या रस्त्यावरून वाहन चालविताना दुचाकीसह सर्वच वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
१९९५ मध्ये तत्कालीन आमदार बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नाने हिटणी नाक्यापासून बसवेश्वर मंदिरापर्यंतच्या संपूर्ण रस्त्याचे पहिल्यांदाच डांबरीकरण झाले होते. त्यानंतर वेळोवेळी रस्त्याच्या ठरावीक भागाचेच डांबरीकरण करून मलमपट्टी करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
चालू वर्षी पहिल्या पावसातच रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आणि ठिकठिकाणी तळी निर्माण झाली आहेत. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. म्हणूनच हिटणी नाक्यापासून ते बसवेश्वर मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे फेरडांबरीकरण करावे, अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे.
चौकट :
भाविकांची मोठी वर्दळ
सीमाभागातील एक जागृत देवस्थान म्हणून हिटणीच्या बसवेश्वर मंदिराची ओळख आहे. त्यामुळे शासनाने या मंदिराला ‘क’वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. दर सोमवारी व अमावास्येला बाहेर गावचे शेकडो भाविक दर्शनासाठी हिटणीला येतात. त्यामुळे या रस्त्यावर भाविकांचीही मोठी वर्दळ असते.
प्रतिक्रिया :
लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांनी रस्त्याची समक्ष पाहणी करावी. फेरडांबरीकरणाशिवाय पर्याय नाही. परंतु, किमान मुरूम टाकून पावसाळ्यात ग्रामस्थ आणि बाहेरील प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी.
- अॅड. सुधाकर भोपळे-पाटील, सामाजिक कार्यकर्ते.
प्रतिक्रिया : १९८३ मध्ये विस्थापित पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासह गावठाण विस्तार, शेती व पिण्याचे पाणी आणि रस्त्यासाठी ग्रामस्थांना वेळोवेळी संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे मुख्य रस्त्याच्या प्रश्नासाठी गावकऱ्यांनी एकजुटीने लढा देण्याची गरज आहे.
- प्रशांत बाबाण्णा पाटील, युवक कार्यकर्ते.
फोटो ओळी : हिटणी (ता. गडहिंग्लज) येथील मुख्य रस्त्याची अशी दुर्दशा झाली आहे.
क्रमांक : २१०६२०२१-गड-०६