पाचगाव : संभाजीनगर ते शिवाजी विद्यापीठ रस्त्यावर हॉकी स्टेडियमजवळचा चौक हा मटका, जुगार, गुटखा विक्रीसह फाळकुटदादांचा अड्डा बनला आहे. या प्रकारांचा स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. या परिसरात नव्याने उभ्या राहात असलेल्या संकुलांमुळे येथे सुशिक्षित लोकांची वस्ती वाढत असून, अशा अवैध प्रकारांमुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
संभाजीनगर, कळंबा, रायगड कॉलनी, जारागनगर, रामनंदनगरसह पाचगाव परिसरातील रहिवासी रिंगरोडचा जास्त वापर करतात. तसेच शहराबाहेरून कोकणात जाण्यासाठीही या रस्त्याचा वाहनचालकांकडून वापर होतो. या रस्त्यावरून वर्दळ जास्त असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा हातगाडीवाल्यांनी छोटे-मोठे व्यवसाय थाटले आहेत. या व्यवसायांसोबतच अवैध धंदेही वाढू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी ध्यानचंद हॉकी स्टेडियम चौकात दोघांना गांजा विकताना पकडले होते. मद्यपींचा वावर तर दररोजचा झाला आहे. हॉकी स्टेडियम चौकाजवळ वाईन शॉप व बिअर शॉपी असल्याने मद्यपी सायंकाळी गटागटाने याठिकाणी एकत्र जमतात, रात्री तर मद्यपींच्या गर्दीने हा परिसर फुलून जातो. रस्त्याच्या बाजूला कोठेही गाड्या लावून अगदी लहानांपासून ते वृद्धापर्यंत दारू खरेदी करण्यासाठी दारूच्या दुकानात व बिअर शॉपीमध्ये गर्दी केली जाते.
हॉकी स्टेडियमचे रिकामे दुकानगाळे, चौकातील रिकामी जागा, खाद्यपदार्थांच्या गाड्यांमागील रिकामी जागा, फूटपाथ अशा ठिकाणांचा वापर करत व येथील अंधाराचा फायदा घेत मद्यपींची टोळकी बसलेली असतात. पोलीस जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.