कोल्हापूर : टोकीओ येथे सुरु ऑलिंम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीला हरवून कांस्यपदकाची कमाई केली. तब्बल ४१ वर्षांनी मिळालेल्या या यशामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे गुरुवारी सकाळी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयमवर खेळाडूंसह हॉकीप्रेमींनी हलगीच्या कडकडाटात जल्लोष करीत साखर पेढे वाटले.
टोकीओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने उपांत्य फेरीत बेल्जियमकडून ५-२ असा पराभव स्विकारला. त्यानंतरही संघाने हार न मानता कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत बलाढ्य जर्मनी संघास ५-४ असे पेनॅल्टी स्ट्रोकवर हरवत कास्य पदक पटकाविले.
तब्बल ४१ वर्षांनी देशाला कांस्य पदक मिळाल्यामुळे देशासह कोल्हापूरातील हॉकी प्रेमींनीही पारंपारिक पद्धतीने हलगीच्या कडकडाटात भारतीय संघाचे अभिनंदन करीत जल्लोष केला. यावेळी उपस्थितांना साखर पेढे वाटले. दिड तासांहून अधिक काळ हा जल्लोष कोल्हापूरातील मेजर ध्यानंचंद हॉकी स्टेडीयमवर सुरु होता.
या जल्लोषात राष्ट्रीय हॉकीपटू विजय सरदार- साळोखे, सागर यवलुजे, सागर जाधव, नजीर मुल्ला, योगेश देशपांडे, संतोष चौगले, मोहन भांडवले, समीर जाधव, समीर भोसले, प्रकाश पैठणकर, प्रदीप पोवार, आंतरराष्ट्रीय हॉकी पंच व प्रशिक्षक श्वेता पाटील, रमा पोतनीस यांच्यासह हॉकी खेळाडू सहभागी झाले होते.