कोल्हापूर : विविध शासकीय पदांच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षा देण्याच्या मर्यादेबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) निर्णयाच्या परिपत्रकाची कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने गुरूवारी दसरा चौकामध्ये होळी केली. राज्य शासनाने एमपीएससीबाबतचा हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
अन्यायकारक निर्णय मागे घेतलाच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देत सकल मराठा समाजातील बांधव, विद्यार्थी आणि अखिल भारतीय मराठा महासंघातील पदाधिकारी, सभासदांनी एमपीएससीच्या परिपत्रकाची होळी केली. मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली असून, सारथीबाबत गोंधळ सुरू आहे.
अशास्थितीत आता एमपीएससीने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त सहावेळा परीक्षा देता येईल, असा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. त्याचा फटका मराठा समाजातील युवक-युवतींना बसणार आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही या निर्णयाच्या परिपत्रकाची होळी केली आहे.
हा निर्णय राज्य शासन, एमपीएससीने त्वरित मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अवधूत पाटील यांनी दिला. प्रतिकसिंह काटकर, पवन पवार, आदी विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकाश पाटील, महादेव पाटील, शंकरराव शेळके, प्रताप नाईक-वरूटे, दीपक पाटील, शैलेजा भोसले, संजीवनी चौगुले, तेजस्विनी नलवडे, अजित नलवडे, दीपा डोणे, राजेंद्र पाटील, सुनील पाटील, शरद साळुंखे, दिलीप सावंत, गोपाळ पाटील, आदी उपस्थित होते.