गांधीनगर : गांधीनगर ग्रामपंचायतीच्या सफाई कामगारांना सामूहिक रजेवर गेल्याबद्दल प्रशासनाने दिलेल्या नोटिसींची दलित महासंघाच्या वतीने होळी करण्यात आली. भ्रष्ट प्रशासनाच्या कारभाराबाबत ग्रामपंचायत कार्यालयासमोर निदर्शने करत आंदोलकांनी निषेध केला. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष लालासाहेब नाईक यांनी केले.निदर्शनानंतर कामगार व कार्यकर्त्यांच्या सभेत नाईक म्हणाले, उत्पन्नाचे खोटे कारण पुढे करून कामगारांना जर छळत असाल, तर दलित महासंघ गप्प बसणार नाही.रि. स. नं. ५४/१ वरील अनधिकृत बांधकाम काढून टाकावे, असा गावसभेत ठराव झाला असताना प्रशासन का गप्प बसते? असा सवाल करून नाईक म्हणाले, ग्रामपंचायतीच्या गाळ्याचे थकीत भाडे असताना व लेखापरीक्षणाचे ताशेरे असताना त्याची पावती प्रशासन कसे काढते? अनधिकृत बांधकामाबाबत विविध पक्षांकडून, कार्यकर्त्यांकडून वर्षानुवर्षे तक्रारी होऊनही त्याकडे डोळेझाक का झाली? असा संतप्त सवाल नाईक यांनी केला.दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष अनिल मिसाळ, आप्पासाहेब कांबळे, कामगार नेते निवास लोखंडे, अभिजित अवघडे, आदी सहभागी झाले होते.
गांधीनगर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या नोटिसींची होळी
By admin | Published: March 19, 2015 11:38 PM