कोल्हापूर : ‘होळी करा लहान, पोळी करा दान, शेणी करा स्मशानभूमीस दान’ असे आवाहन करत मंगळवारी शहरातील काही सामाजिक संस्थांनी महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस शेणी दान करून विधायक उपक्रमाची जोड दिली. याशिवाय पुढील दोन दिवसांत मोठ्या संख्येने विविध संस्थांतर्फे शेणी दान करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.फुलेवाडी येथील मानसिंग पाटील प्रेमीच्यावतीने ५१ हजार शेणी पंचगंगा स्मशानभूमीस दान केल्या. हे शेणी दान करण्याचे यंदाचे तिसरे वर्षे होते. सकाळी फुलेवाडी दत्त मंदिर चौकात महापालिकेचे उपायुक्त मंगेश शिंदे यांच्या हस्ते शेणी भरलेल्या वाहनांचे पूजन करण्यात आले.
यावेळी मानसिंग पाटील, अॅड. सुरेश कांबळे, अॅड. सी. बी. कोरे, माजी नगरसेवक सर्जेराव पाटील, कृष्णात पाटील आदी उपस्थित होते. सुमारे १२ ट्रॅक्टर-ट्रॉली भरून या शेणी दुपारी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये दान करण्यात आल्या.याशिवाय सामाजिक कार्यकर्ते बाबूराव पागर यांनी सुमारे १५०० शेणी स्मशानभूमीस दान केल्या.
याशिवाय सानेगुरुजी वसाहत परिसरातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव कमिटीच्यावतीने स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्यावतीने रविवारी (दि.२४) सुमारे पावणे दोन लाख शेणी पंचगंगा स्मशानभूमीस दान करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी १ लाख, गेल्यावर्षी दीड लाख तर यंदाचे हे तिसरे वर्षे असल्याने पावणे दोन लाख शेणी दान करण्यात येणार आहेत.महाद्वार रोडवरील वांगी बोळ येथील अचानक तरुण मंडळाच्यावतीने सलग नऊ वर्षे हा शेणी दानचा उपक्रम केला जात आहे. यंदाही त्यांच्यातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे ५१ हजार शेणी दान करण्यात येणार आहेत.
कचरा व्यवस्थापन जागृती कराहोळी करायची असेल तर रस्त्यावर नको, मैदानात पण प्रतीकात्मक करा, असे आवाहन निसर्ग मित्र संस्थेचे अनिल चौगुले यांनी करून या होळी सणाला विधायक उपक्रमाची जोड देण्यासाठी कचरा व्यवस्थापनबाबत जागृतीची मोहीम प्रत्येकाने हाती घ्यावी, असे आवाहन केले आहे.