लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील डीकेएएससी महाविद्यालयाने फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरण्यास नकार दिला होता. त्यामुळे भाजपच्या विद्यार्थी आघाडीने फी भरण्याच्या नोटिसीची होळी केली. तसेच प्राचार्या व्ही. एस. ढेकळे यांना निवेदन दिले आणि नोटीस मागे घेण्याची विनंती केली. ढेकळे यांनी विनंती मान्य करून फॉर्म भरून घेण्याच्या सूचना दिल्या.
कोरोनामुळे राज्यभर लॉकडाऊन होऊन सर्वच घटकांची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली. परिणामी शालेय फी भरण्यासाठी आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. तरीही विद्यालयाने नोटीस काढून गत शैक्षणिक वर्षातील संपूर्ण फी भरावी; अन्यथा शैक्षणिक नुकसानीस महाविद्यालय जबाबदार राहणार नाही, असा इशारा दिला. याबाबत विद्यार्थी आघाडीकडे तक्रार आल्याने आंदोलन करण्यात आले. आंदोलनात काशिनाथ बावडेकर, मयूर दाभोळकर, तेजस शिंदे, धिरज बनसोडे, मुजम्मिल मोमीन, सकलेन गैबान, सोहेल शेख, आदींसह विद्यार्थी सहभागी झाले होते.