कोल्हापूर : जिल्हा हिवताप कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याच्या शासन निर्णयाच्या परिपत्रकाची होळी कर्मचाऱ्यांनी भवानी मंडपासमोर केली. जिल्ह्यातील दीडशेहून अधिक कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला.निष्काळजीपणाचे कारण सांगून राज्य शासनाकडे असलेला जिल्हा हिवताप विभाग जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गेल्या २२ नोव्हेंबरला त्याचे परिपत्रकही काढण्यात आले आहे.
शासकीय सेवेतून जिल्हा परिषदेच्या सेवेत जावे लागणार असल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयाविषयी कमालीची नाराजी आहे. यासंदर्भात वारंवार अर्ज विनंत्या करूनही शासन आपल्या निर्णयावर ठाम असल्याने संतप्त झालेल्या कर्मचाºयांनी आता थेट रस्त्यावरच उतरण्यास सुरुवात केली आहे.भवानी मंडपासमोर झालेल्या या आंदोलनात जिल्हा प्रयोगशाळा वैज्ञानिक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, आरोग्यसेवक, आदींनी सहभाग घेतला. हिवताप कर्मचारी हस्तांतरण विरोधी कृती समितीच्या वतीने झालेल्या या आंदोलनात राज्याध्यक्ष बाजीराव कांबळे, नितीन कांबळे, राकेश घोडके, प्रतिभा लोळगे, सुचित्रा कदम, सुधाकर कुंभार, शहाजी पाटील, युवराज पाटील, महेश नलवडे, प्रकाश पोवार, सुभाष कांबळे, सुरेश लाड, भक्ती करकरे, मनीषा इंगवले, आदींनी सहभाग घेतला.