कोल्हापूर : महत्त्वाकांक्षी शिवसैनिकांमुळे जिल्ह्यातील शिवसेना पुरती पोखरली असताना पक्षनेतृत्वाकडून केवळ पक्षाची शिस्त बाळगा, असा निरोप धाडून वादावर पडदा टाकण्याच्या होत असलेल्या प्रयत्नाने सामान्य शिवसैनिक हवालदिल झाला आहे. शिवसेनेतील व्यक्तिगत वादामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असताना आणि अब्रू चव्हाट्यावर येत असतानाही पक्ष नेतृत्वाने कारवाई करण्याऐवजी त्यांना शांत राहण्याचे आदेश दिले जात असले तरी अशाने अंतर्गत वादाने भविष्यात शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता जुन्या तसेच निष्ठावंत शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे. अशा पोकळ प्रयत्नांतून काहीच साध्य होणार नाही, अशी शिवसैनिकांची धारणा झाली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोपाचे फटाके फुटायला लागले. शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव का झाला, याची कारणमीमांसा पक्षपातळीवरून कोणीही केली नसताना जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि आमदार यांनी मात्र पराभवास कोण कारणीभूत आहे याची जाहीर चर्चा, मेळावे, पत्रकार बैठका घेऊन करायला लागले. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेची चांगलीच करमणूक झाली, त्यामुळे शिवसेनेची कधी नाही ती बदनामी या लोकसभा निवडणुकीत झाली. तरीही शिवसेनेचे मुंबईतील नेते मात्र अद्याप गप्पच आहेत. पक्षशिस्त पाळा, शांत रहा, असा सबुरीचा सल्ला देत आहेत. कोल्हापुरातील स्थापनेपासूनच शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण लागले आहे. आधी सुरेश साळोखे व कै. शिवाजीराव चव्हाण यांच्यात गटबाजी सुरू झाली. त्यानंतरच्या काळात रामभाऊ चव्हाण व सुरेश साळोखे यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यानंतर जिल्ह्यात आमदार गट आणि जिल्हा प्रमुख गट अशा सरळ दोन गटांत शिवसेना विभागली ती आजअखेर तशीच आहे. आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यातील वादाने तर सीमा ओलांडली. त्यांच्यातील वादशहराची आमदारकी व त्यानंतरचे व्यवहारिक मतभेद यातून निर्माण झाले आहेत. दोघेही एकाच गुहेतील असल्याने दोघांचे कार्य आणि कर्तृत्व एकमेकांना चांगले ठाऊक आहे. त्यामुळे त्यातूनही हे वाद विकोपाला गेले आहेत. त्यातून दोघांच्या निष्ठेबद्दल आणि व्यवहाराबद्दल सामान्य शिवसैनिकांना शंका येत आहे,. या वादावर शिवसेना नेतृत्वाने तोडगा काढला नाही, तर त्याचे परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवर होतील, अशी भीती शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.
सेनेच्या दुखण्यावर ‘पोकळ’ मलमपट्टीच हतबल
By admin | Published: May 24, 2014 12:55 AM