कोल्हापूर : मुस्लिम धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र समजला जाणाऱ्या रमजान महिन्यातील एक महिन्याच्या रोजांना (उपवास) बुधवार (दि. १४)पासून सुरुवात होत आहे. गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही कोरोना व लॉकडाऊनचे सावट असतानाही घराघरात रोजांची तयारी सुरु झाली आहे.
दरम्यान, चंद्रदर्शन झाले तरच बुधवारी पहिला रोजा असणार आहे. मंगळवारी चंद्रदर्शन झाल्याबाबत हिलाल कमिटी घोषणा करेल. तत्पूर्वी आज (साेमवारी) हिलाल कमिटीची मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठक होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजानचे हे पवित्र पर्व कशा पद्धतीने साजरे करायचे, याबाबतचा निर्णय यावेळी होणार आहे.
हा संपूर्ण महिनाभर मुस्लिमांच्या घरोघरी नमाज पठण, दानधर्म असे सुरु असते. सामुदायिक नमाजपठणही होते, पण गेल्यावर्षी आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे या प्रथेत बदल झाला आहे. घरातच नमाज अदा करावी, पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये, असे आवाहन प्रशासनाने यावर्षीही केले आहे. हिलाल कमिटीनेही याबाबत प्रशासनाला सहकार्याची भूमिका ठेवली आहे. त्यामुळे मशिदीमध्ये किती लोकांच्या उपस्थितीत नमाज पठण होईल, याबाबतचे धोरण हिलाल कमिटी सदस्य एकत्रितपणे ठरवणार आहेत.