कोल्हापूर : चंद्र दर्शनाची साक्ष न मिळाल्याने मुस्लिम बांधवांचे रमजान रोजे उद्या, मंगळवारपासून सुरू होत आहेत. सायंकाळी झालेल्या मगरीब नमाजानंतर मुस्लिम बोर्डिंगमध्ये झालेल्या हिलाल कमिटी (चांद कमिटी)च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.मन्सूर आलम कासमी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैेठकीत मुंबई, बंगलोर, लखनौ, दिल्ली, देवबंद, रत्नागिरी, रायगड इंडी, तसेच अन्य शहरांशी संपर्क साधण्यात आला. या ठिकाणांहून चंद्रदर्शनाची साक्ष न मिळाल्याने मंगळवारपासून रमजान रोजे सुरू होत असल्याचा निर्णय उलमा कमिटीचे अध्यक्ष मौलाना मन्सूर आलम कासमी यांनी जाहीर केला.यावेळी मौलाना इरफान कासमी, मुबीन बागवान, अब्दुलराजिक सिद्दीकी, नाझिम पठाण, अब्दुल रऊफ नाईकवडे, अब्दुलसलाम कासमी, बशिर नायकवडी, अब्दुलवाहीदी सिद्दीकी, हाफीज रफीक सनदी, आमीन अथणीकर, मुफ्ती ताहीर बागवान, राहमतुल्ला कोकणे, हाफीज फजलेकरीम शेख, रईस कासमी, तसेच कोल्हापूर शहर व उपनगरातील सर्व मसजिदचे पेशइमाम, मुस्लिम बोर्डिंगचे सर्व पदाधिकारी संचालक व अन्य मान्यवर उपस्थित होते.मुस्लिम धर्मात रमजान महिन्याला विशेष महत्त्व असून, या कालावधीत मुस्लिम बांधवांकडून कडक उपवास केला जातो. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण हा उपवास करतात. या महिन्यातील २१, २५ व २७ वा रोजा महत्त्वाचा असतो. महिनाभर सायंकाळी मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण करून उपवास सोडला जातो.
रमजान ईददिवशी हा उपवास सोडला जातो. यानिमित्त बाजारपेठेत उपवासाचे पदार्थ, खजूर, केळी, शीरखुर्मासाठीच्या शेवयांसह गोडपदार्थांची तसेच सुकामेव्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. मुस्लिम कुटुंबांमध्ये रोजांची तयारी सुरू झाली आहे. रमजान महिन्यात दानधर्म करणे पुण्याचे कर्म समजले जाते; त्यामुळे गरीब, गरजू व्यक्ती अथवा नातेवाईकांना मदत किंवा दानधर्म करण्याची प्रथा आहे.