कोल्हापूर : बंद फ्लॅटचे कुलूप बनावट चावीने काढून अज्ञात चोरट्याने सुमारे दीड लाखाची घरफोडी केल्याचा प्रकार घडला. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास शाहुपुरी पहिल्या गल्लीत घडली. याबाबत सुधीर धोंडोपंत किर्तने (वय ७७ रा. ६३५ ई वॉर्ड, शाहुपुरी पहिली गल्ली) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात सोमवारी दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुधीर किर्तने हे वृध्द शाहुपुरी पहिल्या गल्लीत फ्लॅटमध्ये एकटेच राहतात. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चहा पिऊन नेहमीप्रमाणे हॉटेलमधून जेवणाचा डबा आणण्यासाठी बाहेर पडले. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घरी आले असता त्यांच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. अज्ञात चोरट्याने किर्तने यांच्या हालचालीवर पाळत ठेवली. ते नेहमीप्रमाणे सायंकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर चोरट्याने त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप बनावट चावीने उघडून आत प्रवेश केला. घरातील रोख दीड लाख रुपये व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग लंपास केली. याबाबत किर्तने यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
माहितगारांकडून कृत्य
फ्लॅटच्या परिसरात असणारे सीसीटीव्ही फुटेजमध्ये किर्तने घरातून बाहेर पडलेले व पुन्हा आलेले दिसून आले. पण चोरट्यांचा मागसूस लागत नाही. चोरटा हा माहितगार असण्याची शक्यता आहे. किर्तने घराबाहेर पडल्यानंतर अज्ञात चोरट्याने वाहन पार्किंगमधून थेट जिन्यातून किर्तने यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाजवळ जाऊन हे कृत्य केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.