यशोवर्धन मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पहावे तिकडे महापुराचे पाणीच पाणी...उभ्या पिकांत ..घरात.. जनावरांच्या गोठ्यात पाणी. अशा परिस्थितीत सापडलेल्या तालुक्यातील जनतेच्याही डोळ्यातही उद्ध्वस्त संसार आता पुन्हा कसा उभा करायचा या चिंतेने पाणी, अशी भीषण अवस्था शिरोळ तालुक्यात आहे.महापुराचा सर्वाधिक फटका आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या शिरोळ तालुक्याला बसला आहे. ऊस, भाजीपाला, व दूधाच्या उत्पादनासाठी अग्रेसर असलेल्या या तालुक्यातील लोकांच्या डोळ्यात महापुराने पाणी उभा केले आहे. प्रचंड कष्ट व स्वकृर्तत्वाने मोठे झालेल्या तालुक्यातील लोकांना पुरग्रस्तांच्या शिबिरात पाहताना प्रचंड यातना होतात.शिरोळ तालुक्यात ५५ गावे असून या पैकी महापुराचा फटका ४७ गावांना बसला आहे. यापैकी २४ गावांचा संपर्क आजही तुटलेलाच आहे. तर १३ गावे शंभरटक्के पाण्याखाली आहे. पुरस्थिती निर्माण झाल्यानंतर ग्रामस्थांनी शिरोळ, जयसिंगपूर व आजूबाजूंच्या गावात आश्रय घेतला आहे. आहे त्या कपड्यानिशी हे सर्वजण बाहेर पडले होते. शेताचे आणि गावाच्या होणाऱ्या अपरिमित नुकसानीने त्यांच्या अश्रुंचे बांध फुटत आहेत. आयुष्यभर कष्ट करून उभा केलेली शेती, घर-दार, महापुरामुळे बुडाली यातून पुन्हा उभा राहण्यासाठी किती वेळ लागले याची चिंता त्यांना सतावू लागली आहे.ही गावे पाण्याखाली....कनवाड, कुटवाड, शिरटी, हसूर, नृसिंहवाडी, कुरूंदवाड, राजापूर, राजापुरवाडी, खिद्रापुर, औरवाड, गौरवाड, घालवाड, चिंचवाड ही १३ गावे शंभर टक्के पाण्याखाली आहेत. २४ गावांचा आजही संपर्क तुटलेलाच आहे. त्या गावातील जनजीवन विस्कळीतच आहे. या गावामध्ये अत्यावशक सेवा देण्याचे काम एनडीआरएफ व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी काम करत आहे.कुरुंदवाडचा एस.टी. डेपो दत्त कारखान्यातकुरुंदवाड शहराला तर महापुराने चांगलाच वेढा दिला आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या व्यवस्थापनाने गेल्या रविवारी डेपोच्या ४५ गाड्या दत्त साखर कारखान्याच्या परिसरात उभ्या केल्या आहेत.
घरांत, शेतात... डोळ्यातही महापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 1:00 AM