कोल्हापूर : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी आळवणी करत पारंपारिक वाद्यांच्या गजरात कोल्हापूर शहर परिसरात घरगुती गौरी गणपतींचे आज, सोमवार सकाळपासून विसर्जन सुरु झाले. महानगरपालिका प्रशासनाने पर्यावरणपूरक विसर्जनासाठी केलेल्या आवाहनास साथ देत कोल्हापूरकरांनी आपल्या लाडक्या बाप्पांचे पंचगंगा नदी तसेच तलावात विसर्जन न करता कृत्रिम कुंडातून विसर्जनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या सहा दिवसापासून कोल्हापुरात घराघरातून विघ्नहर्त्या गणरायाची प्रतिष्ठापना झाली होती. रोजची पूजा, आरती, विविध प्रकारचे नैवेद्य यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीरसातून न्हावून गेले होते. सोमवार उजाडला तसा गणेशभक्तांना हुरहुर लागून राहिली. घरगुती गौरी, गणपतींचे विसर्जनास सकाळपासूनच सुरवात झाली. परंतु दुपारनंतर लोक मोठ्या संख्येने सहकुटुंब, सहपरिवार गणपती विसर्जनासाठी बाहेर पडले. रात्रीच्यावेळी विसर्जनासाठी मोठी गर्दी होते.
ढोल, तासे, बॅंड, झांज, टाळ अशा पारंपरिक वाद्यांचा गजर, चिरमुरे, फुलांची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर अशा उत्साही वातावरणात, जल्लोषात विसर्जन सोहळा सुरु आहे. पारंपरिक वेशभूषा, डोकीवर भगवी भरजरी टोप्या, फेटे परिधान केलेले भक्त या सोहळ्यात सहभागी झाले होते. विशेष: महिलांही मोठ्या संख्येने गौराईची गाणी म्हणत विसर्जनाच्या सोहळ्यात सहभागी होत आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेने पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे म्हणून संपूर्ण शहरात १८० कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली आहे. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही आपल्या मंडळाच्या आवारात पाण्याच्या काहिली ठेवल्या आहेत. गणेशभक्तांनी या उपक्रमास साथ देत आपल्या मूर्ती या कृत्रिम कुंडात विसर्जत करत होते. नंतर महापालिकेचे कर्मचारी या मूर्ती रंकाळा तलावाच्या पश्चिमेला असलेल्या इराणी खणीत सोडत होते.
इराणी खण, रंकाळा तलाव, कोटीतिर्थ, राजाराम तलाव, राजाराम बंधारा परिसरात मोठी गर्दी होत आहे. तेथे मूर्ती कृत्रिम कुंडात विसर्जन केल्या जात आहेत. पंचगंगा नदी घाटावर कोणालाही सोडण्यात येत नव्हते. तो परिसर बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला आहे. त्याठिकाणी ठेवलेल्या कृत्रिम कुंडातच मूर्ती विसर्जित केल्या जात आहेत.
स्वयंचलित यंत्रणा कार्यन्वीत
महानगरपालिका प्रशासनाने इराणी खणीत मूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्रणा उभी केली आहे. या यंत्रणेचा जलद गतीनेमूर्ती विसर्जनास मदत होत आहे. सुमारे ८० लाख रुपये खर्चून उभारलेल्या या यंत्रणेवर तासाला तीन हजार मूर्ती विसर्जित होतात.
बाप्पाला निरोप देताना मेघराजाची हजेरी
कोल्हापूर शहरातील वातावणात कमालीचा उष्मा जाणवत आहे. वातावरण ढगाळ आहे. अधून मधून मेघराजाही आपली हजेरी लावत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत शहरात दोन वेळा पाऊस पडला. अशाही वातावरणात गणेश भक्तांचा उत्साह कायम आहे.