कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पत्नी सोनल शाह यांनी त्या कोल्हापूरातील ज्या शाळेत शिकल्या, त्या शाळेच्या शतकमहोत्सवाच्या सांगता समारंभात रविवारी पती अमित शाह यांच्यासोबत हजेरी लावली. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर असे महाराष्ट्राचे निम्मे मंत्रिमंडळ बोलावले होते. सोनल शाह यांनी या शाळेच्या कार्यक्रमात मराठीतून भाषण करत जुन्या शाळेच्या आठवणी जागवल्या.कोल्हापूरात माहेरी आलेल्या सोनल शाह यांनी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमापूर्वी आपले पती अमित शाह यांच्यासोबत आई अंबाबाईचे दर्शन घेतले. सोनल यांनी आपल्या भाषणात शाळेचा, वर्गाचा, वर्गमैत्रिणी, शिक्षक, ज्या वर्गात बसत होत्या तेथील बेंच, फळा, एकमेकींच्या डब्यातील खाऊ खाण्याचा, खेळण्याचाही उल्लेख केला. गुजरातपासून दिल्लीपर्यंत फिरलो तरी कोल्हापूरची आणि कोल्हापुरातील माझ्या शाळेची आठवण नेहमी माझ्यासोबत राहील, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. ज्या शाळेत अमित शाह यांच्या पत्नी सोनल शाह शिकल्या, त्या शाळेचे स्वागताध्यक्ष विनोद लोहिया यांनी सोनल शाह यांच्यामुळे शाळेत केंद्रीय गृहमंत्री आल्याचा उल्लेख केला.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केले म्हणून सोनल शाह यांच्याशी संपर्क झाल्याचाही उल्लेख लोहिया यांनी केला आणि सोनल शाह यांनी आपल्या माहेरच्या या शाळेसाठी वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ दोन वर्षापूर्वीच पाच लाख दिले होते. त्यातून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या पुढच्या कार्यक्रमाचे निमंत्रणही दिले. खुद्द अमित शाह यांनीही पत्नीमुळे या शाळेच्या कार्यक्रमात आल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर सोनल शाह यांच्यामुळे शाळेच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे निम्मे मंत्रिमंडळ आल्याचे सांगितले.
वर्गमैत्रिणींची उपस्थितीतब्बल दोन वर्षांनी कोल्हापूरात आलेल्या सोनल शाह आपल्या वर्गमैत्रिणींनाही विसरल्या नाहीत. त्यांनी त्यांच्या वर्गातील २२ वर्गमैत्रिणींनाही आवर्जून निर्मत्रण दिले होते. त्या सर्व जणींना पुढच्या रांगेत बसवण्यात आले होते. इतकेच नव्हे तर त्या ज्यावेळी शिकत होत्या, त्यावेळचे सेवक दौलत भोसले यांनाही बोलावण्यात आले होते.