कोल्हापूर : गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांचे अधिकृत ट्विटर अकौंट हॅक झाल्याची तक्रार मुंबईतील सायबर क्राईम विभागाकडे बुधवारी सकाळी केली. ट्विटर इंडिया कार्यालयालादेखील याबाबतची माहिती कळविण्यात आली. त्यानंतर ट्विटरकडून सायंकाळी साडेसातच्या सुमारास हे अकौंट पूर्ववत झाले.गृहराज्यमंत्री पाटील यांचे ट्विटर अकौंट मंगळवारी हॅक झाले होते. त्यामुळे सर्व ट्विटस् अचानकपणे दिसेना झाले. या अकौंटच्या प्रोफाईलवरील त्यांचे छायाचित्र आणि नावही दिसणे बंद झाले. त्याऐवजी स्पोर्ट ट्विटर असे दिसत होते. त्यामुळे त्यांनी याबाबतची तक्रार सायबर क्राईम विभागाकडे केली.
याबाबतच्या तपासाअंतर्गत ट्विवटरच्या कार्यालयाकडून काही तांत्रिक आणि अन्य माहिती घेण्याची प्रक्रिया सायबर क्राईम विभागाकडून सुरू होती. त्याबरोबर ट्विटरच्या कार्यालयाने मंत्री पाटील यांचे अकौंट सुरक्षित प्रणाली नेले आणि रिकव्हर केले.
सायंकाळी साडेसात वाजता या अकौंटवरील सर्व ट्विटस्, पोस्ट पूर्ववत झाल्या, अशी माहिती मंत्री पाटील यांच्या सोशल मीडिया टीमकडून देण्यात आली. दरम्यान, माझे ट्विटर अकौंट हॅक झाल्याचा कालावधीत काही संदेश पोस्ट झाले असल्यास त्यावर क्लिक करू नये, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले आहे. पुढील तपास सायबर क्राईम विभागाकडून सुरू असल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली.