कोल्हापूर : घरफाळा लागू करण्याच्या कामात आर्थिक नुकसान केल्याच्या ठपका ठेवत गुरुवारी रात्री उशिरा महापालिकेतील करनिर्धारक, संग्राहक संजय भोसले, सिस्टिम मॅनेजर यशपाल रजपूत यांच्यासह सहा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. यामध्ये अधिकाऱ्यांना ३१ प्रकरणांमध्ये तर सिस्टीम मॅनेजर रजपूत यांना १८ प्रकरणांत दोषी ठरविण्यात आले आहे. उपायुक्त निखिल मोरे यांनी ही कारवाई केली असून आठ दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.महापालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफाळा घोटाळा चांगलाच गाजत आहे. ज्येष्ठ नगरसेवक भूपाल शेटे यांनी ३ कोटी १८ लाखांच्या घोटाळ्यामध्ये संबंधितांवर कारवाईसाठी महापालिकेवर उपोषणही केले. कृती समितीनेही श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. चंद्रकांत रामाणे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. या सर्वाची दखल घेत आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी धडक कारवाई सुरू केली आहे.
उपायुक्त निखिल मोरे यांना चौकशी समितीमधील दोषींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. यानुसार घरफाळा विभागाचे करनिर्धारक, संग्राहक संजय भोसले यांना ९ प्रकरणांमध्ये नोटीस बजावली आहे तसेच प्रभारी अधीक्षक दीपक सोळंकी यांना ७ प्रकरण, करनिर्धारक व संग्राहक नंदन कांबळे यांना ११ प्रकरण, घरफाळा कनिष्ठ लिपीक बापू माने यांना ३ प्रकरण, घरफाळा विभाग अधीक्षक तानाजी मोरे यांना १ प्रकरण आणि सिस्टीम मॅनेजर यशपाल रजपूत यांना १८ प्रकरणांत नोटीस बजावली आहे.सिस्टीम मॅनेजरकडून गैरवर्तनघरफाळा घोटाळाप्रकरणी १४ सप्टेंबरला माहिती देण्यासाठी पत्र पाठविले होते. मात्र, आजपर्यंत यासंदर्भात माहिती दिली नाही. ही बाब गंभीर आहे. यामुळे गैरवर्तन, कार्यालयीन शिस्तभंग झाल्याचे दिसून येते. याप्रकरणी तीन दिवसांत खुलासा करण्याची नोटीस सिस्टीम मॅनेजर रजपूत यांना बजावली आहे.
तत्कालिन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ३ कोटी १८ लाख प्रकरणी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले होते; परंतु संंबंधितांनी कारवाई करण्यास चालढकलपणा केला. उपोषण केल्यानंतर आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दखल घेत ही कारवाई केली आहे. १८ प्रकरणांत कोट्यवधींचे नुकसान झाले असून दोषींवर निलंबन आणि फौजदारी कारवाई जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत लढा कायम राहील.भूपाल शेटे, नगरसेवक, महापालिका