कोल्हापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्यामुळे व आर्थिक उत्पन्नाचे स्तोत्र मर्यादित राहिले आहेत. त्यामुळे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या घरफाळा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
महानगरपालिकेने मंजूर धोरणानुसार दि. ३० जूनअखेर घरफाळा भरणाऱ्या करदात्यांसाठी चालू आर्थिक वर्षातील मागणीमध्ये सहा टक्के सवलत देण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आर्थिक उत्पनाचे साधन मर्यादित राहिल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावरदेखील याचा परिणाम होत आहे. त्यामुळेच नागरिकांना दिलासा देण्याबरोबरच कर भरण्यास प्रोत्साहन म्हणून ३१ जुलैपर्यंत सवलतीस मुदतवाढ दिलेली आहे.
यासाठी प्रशासक बलकवडे यांनी त्यांना असलेल्या अधिकारात प्रशासकीय दफ्तरीय ठराव क्रं.१६१ , दि. ३० जूनच्या ठरावानुसार सवलतीचा निर्णय घेतलेला आहे.
ही सवलत योजना लागू करण्यासाठी संगणकीय सिस्टिममध्ये बदल करण्यास सहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा कर वगळता यापूर्वीची मागील थकबाकी आजपासून भरता येणार आहे.
तीन महिन्यांत १७ कोटी जमा -
१ एप्रिल ते ३० जूनअखेर सहा सवलत योजनेचा ३५,८८४ करदात्यांनी लाभ घेतला आहे. या योजनेमधून तीन महिन्यांत १७ कोटी ०९ लाख ०९ हजार ४९६ रुपये जमा झाले आहेत. तर एका दिवसात १ कोटी ५४ लाख ७९ हजार ६१८ रुपयांचा घरफाळा जमा झाला.
थकबाकी भरण्यासाठी संगणकीय सिस्टिममध्ये दुरुस्ती झाल्यावर चालू आर्थिक वर्षाची रक्कम भरणा करण्यासाठी या सवलत योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.