कोल्हापूर : महापालिकेच्या घरफाळा विभागाचा सावळागोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. न्यू शाहूपुरी येथे प्रभाकर प्लाझामधील गाळा थकबाकी नसताना सील केला असल्याचा आरोप संबंधित गाळेधारकांकडून होत आहे; तर संगणकीय प्रणालीत संबंधिताच्या करदाता क्रमांकावर थकबाकी असल्यामुळे कारवाई केली असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे.न्यू शाहूपुरी येथील प्रभाकर प्लाझा येथे वासुदेव कलघटगी यांचा गाळा आहे.महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाच्या वतीने गुरुवार (दि. २३) पासून एक लाखावरील थकबाकीदार मिळकतधारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत ताराराणी कार्यालय जप्ती पथकाने दोन मिळकतींवर कारवाई करून सीलबंद केल्या. यामध्ये कलघटगी यांच्या गाळ्याचा समावेश होता. गाळा क्रमांक एटी-१ (करदाता क्रमांक १७१४६८) ची ५ लाख ३४ हजार ८१७ रुपयांची थकबाकी असल्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली.
याची माहिती कलघटगी यांना मिळताच त्यांनाही धक्का बसला. त्यांच्या कुटुंबीयांनी वकिलांना घेऊनच थेट महापालिका गाठली. थकबाकी नसताना गाळा सील का करण्यात आला, असा त्यांनी सवाल केला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहानिशाही केली. करदाता क्रमांक १७१४६८ वर थकबाकी असल्याचा दावा महापालिकेने केला; तर कलघटगी यांनी केवळ या वर्षातील १४ हजारांचा घरफाळा जमा करणे बाकी असून, आपला करदाता क्रमांक १७०५१० असल्याचे सांगितले. यापूर्वीही असाच प्रकार झाला होता.
पहिल्या मजल्यावरील मिळकतधारकांची थकबाकी असताना नोटीस आम्हाला आली होती. तत्कालीन आयुक्तांकडे रीतसर अर्ज करून याची माहिती दिली होती. तरीही थकबाकी नसताना कारवाई का करण्यात आली, असाही जाब त्यांनी विचारला.
थकबाकी नसताना गाळा सील केला असल्याची तक्रार कलघटगी यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. घरफाळा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली जाणार आहे. यानंतर पुढील कार्यवाही करु.- संजय भोसले,करनिर्धारक, महापालिका.