कोल्हापूर : हनीट्रॅप करून कोल्हापुरातील तरुण कापड व्यापाऱ्याला अडीच लाखाला लुटल्याप्रकरणी अटक केलेल्या टोळीकडून शहरातील आणखी ७ जणांना अशाच पध्दतीने गंडा घातल्याची माहिती तपासात पुढे आली. पण बदनामी व भीतीपोटी अद्याप कोणीही तक्रारीसाठी पुढे आले नाही.
कोल्हापुरातील २७ वर्षीय तरुण कापड व्याापाऱ्याची व्हाॅट्सॲपवर एका अल्पवयीन तरुणीशी चॅटिंगद्वारे ओळख झाली. मैत्रीच्या बहाण्याने संबंधित तरुणीने भेटण्यास बोलवले. कापड व्यापारी १३ नोव्हेंबर रोजी तिला भेटण्यासाठी सावित्रीबाई फुले हॉस्पिटलनजीक मोटारीने आला, तेथून दोघेही रंकाळा परिसरातील फ्लॅटवर गेले. तेथे तरुणीने फ्रेश होण्याचा बहाणा केला. त्याच वेळी तरुणीच्या साथीदारांनी येऊन बेल वाजवली. व्यापाऱ्याने दरवाजा उघडला. त्यावेळी पाच जण थेट फ्लॅटमध्ये व बेडरूममध्ये घुसले. तेथे तरुणी अर्धनग्न असल्याचे लक्षात आले, एकाने मोबाइलवर चित्रीकरण केले. त्यानंतर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्याची धमकी देत विविध ठिकाणी फिरवले. त्याच्याकडून दीड लाखाची रोकड घेतली व दागिने गहाण ठेवून एक लाखाची उचल केली.
पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकत टोळीतील सागर माने, सोहेल ऊर्फ आरबाज वाटंगी, उमेश साळुंखे, आकाश माळी, लुकमान सोलापुरे, सौरभ चांदणे यांना अटक केली. तसेच त्या टोळीतील प्रमुख विजय रामचंद्र गौडा व तरुणी अद्याप बेपत्ता आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आणखी हनीट्रॅप झाल्याच्या संशयाने पोलीस तक्रारदारांचा शोध घेत आहेत.
बेपत्ता विजय गौडा सराईत
हनीट्रॅप टोळीतील पसार विजय गौडा याच्यावर यापूर्वी करवीर पोलीस ठाण्यासह इतर पोलिसांत खून, मारामारी आदी गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलीस त्याच्या व तरुणीच्या मागावर आहेत.
अनोळखीचा व्हिडीओ कॉल उचलल्यास होऊ शकतो ‘हनीट्रॅप’
अटक टोळीने यापूर्वी अनेक व्यापाऱ्यांना हनीट्रॅप करून लुबाडल्याने चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे कोणीही अनोळखी व्यक्तीचा व्हिडीओ कॉल आल्यास तो स्वीकारू नये, त्याचे रेकॉर्डिंग होऊन अश्लील व्हिडीओ चित्रफिती बनवून हनीट्रॅपची शक्यता आहे. त्यामुळे अशा टोळीकडून फसवलेल्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, त्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.