\कोल्हापूर : बालकल्याण संकुलातील मुलांच्या पाठीवर मायेचा हात फिरविण्यासाठी व त्यांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी आपल्या कष्टातील वाटा आवर्जून देण्यासाठी उत्सुक असलेल्या मान्यवरांचा शनिवारी संकुलात अत्यंत कौटुंबिक वातावरणात सत्कार करण्यात आला. ‘लोकमत’ चे मुख्य बातमीदार विश्र्वास पाटील यांच्या हस्ते हा सत्कार झाला.सावंत कोचिंग क्लासेसचे एम. बी. सावंत, ए.पी.क्लासेसचे अनिल पाटील, व्यापारी कुशल पटेल आणि सचिन ग्लास ट्रेडर्सचे सचिन पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संकुलातील मुलेही शिक्षणात मागे राहू नयेत म्हणून प्रतिवर्षी ठराविक मुलांना या क्लासेसतर्फे वर्षभर मोफत शिकविले जाते. त्यांना कांही शैक्षणिक साहित्य लागले, तर ते देखील दिले जाते. गेली अनेक वर्षे हा पायंडा सुरू आहे. त्यांच्याबद्धलची कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले. अध्यक्षस्थानी श्री कन्स्ट्रक्शनचे मालक व संस्थेचे आश्रयदाते एस. एन. पाटील होते. महाराष्ट्राच्या बालकल्याण क्षेत्रात या संस्थेचे काम वेगळे आहे. संस्थेचा कारभार पारदर्शी आहे व येथे दिलेली पै आणि पै या मुलांच्या भल्यासाठीच वापरली जाईल याची खात्री असल्यानेच समाज संस्थेला मोठ्या प्रमाणावर मदत देत असल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले. आम्ही मुलांच्या भवितव्यासाठी काही करायला तयार आहोत. मुलांनी त्याचा उपयोग करून घेऊन उज्ज्वल भवितव्य घडवावे, अशी अपेक्षा एम. बी. सावंत व एस. एन. पाटील यांनी व्यक्त केली.संस्थेच्या मानद कार्यवाह पद्मा तिवले यांनी प्रास्ताविक केले. पद्मजा गारे यांनी सूत्रसंचालन केले. अधिक्षिका अलका मोरे यांनी आभार मानले. सुरुवातीला लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. मुलांनी स्वागत गीत गायिले. (प्रतिनिधी)
बालकल्याण संकुलात दातृत्वाचा सन्मान
By admin | Published: August 04, 2015 12:22 AM