भरत बुटाले
लिंगायत धर्मामध्ये जंगम, शिवाचार्य आणि पंचाचार्य या गुरूंना मानाचे स्थान आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार विवाह सोहळ्याचे कार्य पार पाडले जाते. विवाहाच्या आदल्या दिवशी रात्री मुहूर्ताने हळदी कार्यक्रम होतो. त्यावेळी पाच विडे मांडून सूत्राची दोन कंकणे तयार केली जातात. त्यानंतर व्याही-व्याही एकमेकांना देतात अलिंगन. विवाहादिवशी प्रारंभी चौरंगावर पंचकलश मांडले जातात. नंतर वधू-वराला पश्चिमेकडे तोंड करून लाकडी पाटावर बसवितात. वधूला वराच्या उजव्या बाजूला बसते. त्यानंतर पंचकलशापासून दोºयाची दोन सूत्रे काढली जातात. त्यातील एक गुरूंच्या हातात, तर दुसरे सूत्र वधू-वराच्या हातात देऊन त्या गुरूसूत्रावर नारळ ठेवला जातो. सूत्राबरोबर नारळाचीही दानात्मक पूजा केली जाते. या पूजेला कन्यादान असे म्हणतात.
कन्यादान झाल्यानंतर वराचे व वधूचे मामा त्या दोघांच्या तोंडात साखर घालतात. त्यानंतर अक्षता म्हटल्या जातात. अक्षतावेळी वधू-वराला लाकडी पाटावर बसविले जाते. पाच, सात, अकरा या प्रमाणात सोईनुसार अक्षता म्हटल्या जातात. त्यानंतर वधू-वर पूर्व-पश्चिम असे उभे राहून एकमेकांना हार घालतात. मंगळसूत्र, हळदी-कुंकू व सौभाग्यादी अलंकार असे कार्यक्रम पार पाडले जातात. हळदीच्या वेळेला तयार केलेल्या कंकणात हळकुंड बांधून अक्षतानंतर वधू-वराच्या हातात स्वतंत्र बांधले जाते. अशा प्रकारे लिंगायत धर्मात विवाह पार पाडला जातो.