कोल्हापूर : ढगाळ वातावरण आणि अंगाला बोचणाऱ्या वाऱ्यामुळे दिवसभर अंगातून हुडहुडी जात नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, फेबु्रवारी महिना निम्म्यावर आला तरी अद्याप थंडी जाणवत आहे. उत्तर, पूर्व विभागात पाऊस होत असल्याने त्याचा परिणाम दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.यंदा हवामानाचा लहरीपणा जरा जास्तच पहावयास मिळत आहे. रेकॉर्ड ब्रेक पावसानंतर थंडीही तेवढीच असेल असे वाटत होते. मात्र, नोव्हेंबरअखेर परतीच्या पावसाने पाठ सोडली नाही. त्यानंतर काही दिवस थंडी जाणवली; मात्र त्यामध्ये तीव्रता नव्हती.
जानेवारी महिन्यातही थोडे दिवस ढगाळ वातावरण तर काही दिवस थंडी असेच राहिले. फेबु्रवारी उजाडल्याने उष्णता वाढू लागेल, असे वाटत असतानाच गेली दोन दिवस अचानक बदल झाला. रविवारी पहाटेपासून थंड वारे वाहू लागले. दिवसभर वाऱ्यांची झुळूक राहत असल्याने अंगातून थंडी जात नाही. त्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी अधिकच जाणवू लागली.
रविवारी कोल्हापूर जिल्ह्याचे किमान तापमान १७ डिग्रीपर्यंत आले होते; त्याचबरोबर ढगाचे आच्छादन दिवसभर राहिले. अधूनमधून सूर्यनारायणाचे दर्शन व्हायचे; मात्र पुन्हा ढगाळ वातावरण व्हायचे.
उत्तर व पूर्व भारतात सध्या पाऊस पडत आहे; त्याचा परिणाम हवामान बदलावर झाला आहे. उन्हाळ्या अगोदर थंड वारे वाहत असते; त्यामुळे आगामी तीन दिवस असेच ढगाळ वातावरणासह वारे वाहील, असा अंदाज आहे.
शनिवारनंतर कडक ऊनशुक्रवार (दि. १४) पर्यंत हवामान थंड राहणार आहे. मात्र, शनिवारनंतर तापमानात वाढ होणार आहे. ३६ डिग्रीपर्यंत तापमान जाणार असल्याने उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
वातावरणातील बदल ही उन्हाळ्याची चाहूल आहे. तीन-चार दिवस असेच हवामान राहण्याची शक्यता असून, हलका वळवाचा पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- डॉ. जय सामंत, पर्यावरण शास्त्रज्ञ