बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा तथा शहर आपत्ती निवारण समिती अध्यक्षा जयश्री महावीर गाट होत्या.
शहरात गेल्या चार दिवसांपासून आढळून येत असलेली कोरोनाबाधित रुग्णसंख्या विचारात घेता शहरवासीयांना भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिलेल्या सूचनेनुसार सोमवार (दि. १०) रात्री १२ वाजल्यापासून २० मे अखेरपर्यंत शहरात पूर्ण लॉकडाऊन (जनता कर्फ्यू) जाहीर करण्यात आला होता. मात्र, शहरातील बाधित रुग्णसंख्या सध्या तरी कमी असून, शहरवासीयही योग्य ती खबरदारी घेत शासन नियमाच्या अधीन राहून दैनंदिन व्यवहार करीत आहेत. त्यामुळे सध्या तरी कडक लॉकडाऊनची गरज भासत नसल्याची भूमिका घेत शहरातील व्यापारी, शेतकरी व विविध संघटनांनी नगरपरिषद प्रशासनाच्या कडक लॉकडाऊन निर्णयाला जोरदार विरोध दर्शविला होता. तसेच सोशल मीडियावरती सुद्धा उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. या सर्व घटना विचारांत घेऊन कडक लॉकडाऊनबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात सोमवारी दुपारी सर्व पक्षीय व व्यापारी, शेतकरी यांची व्यापक बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वांनी कडक लॉकडाऊनची गरज नसल्याचे सांगितले. त्यामुळे सोमवारी रात्रीपासून कडक लॉकडाऊन सुरू करण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला.