गणपती कोळी ल्ल कुरूंदवाडतमिळनाडूतील जलिकट्टू या बैलांच्या शर्यतीवरील शासनाने बंदी उठविल्याने महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यती शौकिनांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जलिकट्टूप्रमाणे येथील बैलगाडी शर्यतींवरची बंदी उठवावी, यासाठी तरुणाई पुढे येत असून, भाजप सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे शर्यती शौकिनांचे लक्ष लागून राहिले आहे.महाराष्ट्र विशेषत: पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागात बैलगाडी शर्यतीला विशेष महत्त्व आहे. पूर्वीपासून शेतातील औताची कामे करून वर्षातून गावच्या यात्रा, जत्रा, उरुसाच्या निमित्ताने शेतकरी केवळ हौस म्हणून बैलगाडी शर्यतीतून बैल पळवित असत. यात्रांचा समारोप आजही बैलगाडी शर्यतीनेच केला जातो. या पांरपरिक खेळाला आता व्यावसायिक स्वरूप आले आहे.केवळ विजेत्या झेंड्यासाठी पळविणाऱ्या मालकाला आता बक्षिसाच्या रकमेची हव्यास लागली आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरामध्येही शर्यतीला गर्दी होऊ लागली आहे. शर्यत शौकिनांची संख्या वाढल्याने यात्रांच्या मर्यादित असलेल्या या शर्यतींकडे राजकीय लोकांचे लक्ष वेधल्याने शर्यतींसाठी पाच लाखांपाून पंधरा लाखांपर्यंत बक्षिसांची लयलूट होऊ लागली. त्यामुळे बैलगाडी शर्यतीला लोकोत्सवाचे स्वरूप आले होते. जिंकण्याची जिद्द व बक्षिसांच्या आमिषामुळे शर्यतीमध्ये बैलांना मारहाण करणे, खिळे टोचणे, शेपूट चावणे, याचबरोबर दुचाकी गाड्यांचा इलेक्ट्रिक शॉक देण्याचा प्रकार वाढला होता. शर्यतींमध्ये बैलांचा छळ होत असल्याने बैलगाडी प्राणिमित्र संघटनेच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने शर्यतींवर बंदी आणली आहे. त्यातच बैलांचा समावेश जंगली प्राणी म्हणून वर्गीकरण केल्याने गेल्या काही वर्षांपासून बैलगाडी शर्यतींवर बंदी आली आहे.शर्यती बंदीमुळे ग्रामीण भागातील यात्रा, जत्रातील उत्साह गेला आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यती पुन्हा चालू होण्यासाठी बैलगाडी मालक, चालक व शर्यत शौकिनांची आंदोलने झाली. मात्र, त्याला यश आले नाही.तमिळनाडू जलिकट्टू या बैलांच्या जीवघेण्या खेळाला तेथील नागरिकांच्या आंदोलनामुळे राज्य शासनाने परवानगी दिली आहे. जलिकट्टू खेळाइतका जीवघेणा खेळ बैलगाडी शर्यत नक्कीच नाही, असे असतानाही जलिकट्टू खेळाला तमिळनाडू सरकारने बंदी आदेश उठविल्याने महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत शौकिनांचा आत्मविश्वास वाढला आहे. तमिळी जनतेप्रमाणे बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी, यासाठी सरकार कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण शर्यत शौकिनांचे लक्ष लागून राहिले आहे.
बैलगाडी शर्यतीबाबत आशा पल्लवित
By admin | Published: January 30, 2017 11:50 PM