लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य शासनाने फुटबाॅलसह सर्वच खेळांमधील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसंबंधी नियमावलीमध्ये सुधारणा करावी. याबाबत ‘लोकमत’मधून वेळोवेळी वृत्त प्रसारित करून आवाज उठविला होता. याची दखल घेत यंदाच्या पुरस्कारासंबंधी क्रीडा विभागाने खेळाडू, प्रशिक्षक, संघटना यांच्याकड़ून अभिप्राय व सूचना मागविली आहे.
या पुरस्कारामध्ये फुटबाॅल खेळात खेळाडू, संघटक, मार्गदर्शक पात्रता निकषात बसत नव्हते. अनेक फुटबाॅलपटूंना या पुरस्कारापासून वंचित राहावे लागत होते. फुटबाॅल या खेळात खेळाडूंना संतोष ट्राॅफीसारख्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण, रौप्य अथवा कांस्य अशी पदके सलग चार वर्षे मिळवावी लागत होती. हे जमलेच नाही तर फेडरेशन कप, बी.सी.राॅय चषक किंवा आंतरराष्ट्रीय वरिष्ठ फुटबाॅल स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागते. विशेष म्हणजे भारतीय फुटबाॅल संघातून प्रतिनिधित्व केले तरी हा पुरस्कार महाराष्ट्रातील फुटबाॅलपटूंना मिळालेले नाही. संघटक-कार्यकर्त्यांना हा पुरस्कार मिळण्यासाठी देशभरात अनेक सराव शिबिरे व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या परदेशात सहली नेल्या पाहिजेत. त्याचे प्रमुख प्रशिक्षकपद भूषविले पाहिजे, असे निकष आहेत. त्यामुळे आतापर्यंत फुटबाॅलसारख्या खेळात गेल्या वीस वर्षात एकाही खेळाडू, संघटक, प्रशिक्षकांना हा पुरस्कार मिळालेला नाही. त्यामुळे यंदा निकष बदलासंदर्भात क्रीडा विभागाने सूचना व अभिप्राय मागविले आहेत. त्यामुळे यंदा तरी फुटबाॅल खेळातून शिवछत्रपती पुरस्कार मिळणार का, असा सवाल राज्यातील फुटबाॅलप्रेमींकडून विचारला जात आहे. याबाबत १४ फेब्रुवारी २०१८ व ९ जानेवारी २०२०ला ‘लोकमत’च्या राज्यभरातील आवृत्तींमधून याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत क्रीडा विभागाने यंदा निकषाबाबतचे अभिप्राय व सूचना मागविल्या आहेत.
कोट
शिवछत्रपती पुरस्काराबाबत क्रीडा विभागाकडून यंदा निकष बदलाबाबतचे अभिप्राय, सूचना मागविण्यात आल्या आहेत. या संदर्भात मी स्वत: जातीनिशी क्रीडा विभागाकडे पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे यंदा फुटबाॅलमधून निश्चितच हा पुरस्कार जाहीर होईल, अशी आशा आहे.
- मालोजीराजे, उपाध्यक्ष, वेस्टर्न इंडिया फुटबाॅल असोसिएशन, मुंबई
कोट
शिवछत्रपती पुरस्कारासंबंधी आलेल्या सूचना, अभिप्रायांचा क्रीडा व युवक सेवा संचालनालय निश्चतच विचार करेल.
- डाॅ.चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी, कोल्हापूर