राजाराम पाटील - इचलकरंजी -विधानसभा निवडणुका आणि दिवाळीनंतर येथील वस्त्रोद्योगाला आगामी हंगामाचे वेध लागले आहेत. केंद्रापाठोपाठ राज्यात भाजपचे सरकार स्थापित होत असल्याने वस्त्रोद्योगासाठी ‘अच्छे दिन’ येतील, अशी आशा पल्लवित झाली आहे. यंत्रमाग कापडाला मागणी आणि चांगला भाव मिळण्याबरोबरच आॅटोलूम कापडालाही किफायतशीर दर मिळेल, अशी अपेक्षा असल्याने वस्त्रोद्योगात उत्साहाचे वातावरण आहे.गतवर्षी यंत्रमाग कामगारांचे वेतन वाढीचे आंदोलन, सायझिंग कामगारांची किमान वेतनाची मागणी, वहिफणी कामगारांची मजुरीवाढ, अशा कारणांबरोबरच कापूस व सुताचे चढे भाव यांमुळे येथील वस्त्रोद्योगात अस्थिरता होती. त्याचा परिणाम कापड उत्पादनावर झाला. त्यामुळे काही प्रकारचे कापडाचे उत्पादन भिवंडी, मालेगाव, बृहानपूरसारख्या यंत्रमाग केंद्राकडे स्थलांतरित झाले आणि कापड उत्पादक, यंत्रमागधारक व व्यापारी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले होते.अशा पार्श्वभूमीवर चालूवर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा हंगाम आला. त्यामुळे यंत्रमाग कापड उत्पादनाच्या हंगामाची घडी विस्कटली. यावर्षी कापूस व सुताचे भाव काहीसे कमी होत स्थिर असूनसुद्धा निवडणुकांमुळे कापड खरेदी-विक्रीचे व्यवहार अस्थिर राहिले. तरीसुद्धा यंत्रमाग कापडास मागणी असल्याने यंत्रमागधारकांना ‘अच्छे दिन’ होते; पण आॅटोलूम कारखानदारांना मात्र आर्थिक मंदीचा सामना करावा लागला. त्यांच्या जॉबरेटमध्ये घट झाली. ज्यामुळे सरासरी दोन ते चार पैसे प्रतिमीटर नुकसान सोसावे लागले.आता विधानसभा निवडणुका संपल्या असून, दिवाळी सणानिमित्त वस्त्रोद्योगातील सर्वच प्रकारचे कारखाने बंद झाले आहेत. साधारणत: नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुरळक प्रमाणात कारखाने सुरू होतील आणि शहर व परिसरातील यंत्रमाग दुसऱ्या आठवड्यानंतर पूर्ण क्षमतेने चालू होतील. केंद्रापाठोपाठ राज्यातही भाजपचे सरकार स्थापित होत आहे. दोन्हींकडे एकाच पक्षाची सत्ता राहिल्याने वस्त्रोद्योगाला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा आॅटोलूम ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष गोरखनाथ सावंत व यंत्रमाग जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी बोलून दाखविली.आगामी लग्नसराई आणि विविध सणांच्या येणाऱ्या हंगामात देशांतर्गत बाजारपेठांमध्ये विविध प्रकारच्या कापडांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होईल, अशी अपेक्षा मोठ्या व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, आदी राज्यांमध्ये कापसाचे पीकही चांगले येईल. जेणेकरून वस्त्रोद्योगामधील यंत्रमाग व आॅटोलूमवर उत्पादित कापडाला चांगली मागणी राहील. तसेच भावही चांगला मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.अत्याधुनिक प्रोसेसर्सची उणीवइचलकरंजी परिसरामध्ये निर्यातीत दर्जाच्या कापड उत्पादनासाठी आधुनिक प्रोसेसर्सची उणीव आहे. परिणामी मूल्यवर्धित कापड निर्मितीच्या मर्यादा पडत आहेत. कापड उत्पादनाचा दर्जा सुधारत नसल्याने इचलकरंजीच्या कापडास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठा उठाव मिळत नाही म्हणून येथे आधुनिक प्रोसेसर्स व्हावे. जेणेकरून कापडास उत्तम भाव मिळण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर उठाव होईल. यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी सांगितले.इचलकरंजीला मंत्रिपदाची आशाविधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेले भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर हे दुसऱ्यांदा निवडून येत आहेत. निवडणूक प्रचारसभेत हाळवणकर यांना मंत्रिपद मिळण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. त्यामुळे मंत्रिमंडळात ज्येष्ठतेनुसार त्यांना वस्त्रोद्योग खात्याचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाला चांगले दिवस येतील, अशी चर्चा येथील उद्योजक व व्यापाऱ्यांमध्ये आहे.
यंत्रमाग उद्योगास ‘अच्छे दिन’ची आशा
By admin | Published: October 23, 2014 10:21 PM