करवीर छत्रपती घराण्याचा लोककल्याण व जनसेवेचा वसा व वारसा समर्थपणे पुढे चालवणाऱ्या खासदार संंभाजीराजे यांचा आज गुरुवारी सुवर्णमहोत्सवी वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या कार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप..
किल्ले संवर्धन असो की मराठा आरक्षणाची लढाई त्यासाठी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालथा घालणारे नेतृत्व अशी खासदार संभाजीराजे यांची ओळख महाराष्ट्रात घट्ट झाली आहे. राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचे असो त्यांनी घेतलेल्या भूमिकेला कायमच महत्त्व निर्माण झाले आहे. फक्त मराठा नव्हे तर बहुजन समाजातील स्वच्छ चारित्र्याचे व चांगला भविष्यकाळ असलेला उमदा नेता म्हणून महाराष्ट्राला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कोल्हापूरपासून उस्मानाबाद ते नागपूरपर्यंत मुख्यत: तरुणाईमध्ये कार्यातून त्यांनी मोठे पाठबळ निर्माण केले आहे. अगदी सुरुवातीपासून मराठा आरक्षणासाठीची लढाई, राज्यात काढलेली शिवशाहू रथयात्रा, रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्याचा लोकोत्सव आणि दिल्लीतील शिवजयंती सोहळा हे खासदार संभाजीराजे यांच्या मागील दहा वर्षांतील कार्याचे ठळक टप्पे आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे संभाजीराजेंच्या जीवनाचे आदर्श आहेत. त्यांचे विचार स्वतः अंगीकृत करून त्यानुसार ते वाटचाल करत आहेत. ‘सह्याद्री प्रतिष्ठान’, ‘अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती’, या संस्थांचे ते प्रमुख मार्गदर्शक आहेत. त्यांच्या पुढाकारातूनच दुर्गराज रायगडावर प्रतिवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. राजसदरेवर रिकाम्या मेघडंंबरीत शिवाजी महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती बसविण्यात आली. दिल्लीत भव्य दिव्य शिवजयंती साजरी करण्यास त्यांनीच सुरुवात केली. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन या संस्थेचे ते पेट्रन आहेत. ‘मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम’साठी भरघोस निधी केंद्राकडून मंजूर करून आणला. कोल्हापुरातील रखडलेल्या शिवाजी पुलाचे काम मार्गी लावले. एका पुलासाठी देशाचा कायदा बदलण्याची ताकद संभाजीराजे यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. कोल्हापूर विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी ते कायमच प्रयत्नशील आहेत.
दोन वर्षांपूर्वीच्या भीषण महापुरात संभाजीराजें गोरगरिबांच्या मदतीला धावून गेले. पूरबाधित लोकांचे संसार उभारण्यासाठी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राज्यभरातून मदत झाली. सामाजिक मदतीचे कोणतेही कार्य असो तिथे छत्रपती घराणे व खासदार संभाजीराजे हे कामयच धावून गेले आहेत. त्यामुळेच या घराण्याबद्दल लोकांच्या मनांत मोठी आपुलकी आजही जपली आहे. राजर्षी शाहूंच्या कार्याचा कृतिशील वारसा घेऊन त्यांची वाटचाल सुरू आहे म्हणूनच महाराष्ट्राला त्याच्या नेतृत्वाबद्दल आदर वाटत आला आहे.
आझाद मैदानावरील ‘तो’ क्षण...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईत शेवटच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी आझाद मैदानात केलेल्या आवाहनाला मराठा समाजाने दिलेला प्रतिसाद एकमेकांविषयीचा विश्वास दर्शवतो. तणाव असताना त्यांनी हाताळलेली परिस्थिती महाराष्ट्रातल्या सामाजिक एकोप्याला अबाधित ठेवणारी ठरली. त्यातून ‘महाराष्ट्राचे नेते’ म्हणून त्यांची ओळख प्रस्थापित झाली.
तरुणाईचे आशास्थान...
संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रातील हजारो तरुण गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करत आहेत. दुर्गराज रायगड किल्ल्यावर शास्त्रोक्त पद्धतीने उत्खनन करणे, जतन करणे, तसेच गडाचे ऐतिहासिक महत्त्व, दुर्गमत्त्व अबाधित ठेवून पर्यटनाच्या दृष्टीने गडाचा विकास करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. महाराष्ट्रातील सर्वच किल्ल्यांचे जतन, संवर्धन करण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘फोर्ट फेडरेशन’ची स्थापना केली आहे.
छंद असेही...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्या शाळेत शिकले त्या राजकोट येथील राजकुमार कॉलेज येथेच संभाजीराजे यांचे शिक्षण झाले. त्यांनी बी.ए., एम.बी.ए. या पदव्या संपादित केल्या आहेत. क्रिकेट, फुटबॉल, पोहणे व घोडेस्वारीमध्ये त्यांना विशेष रस आहे. पर्यटन फोटोग्राफी व वाचन हे त्यांचे आवडते छंद आहेत.
प्रतिनिधी...