शिरोळ : आशा व गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, सामाजिक सुरक्षा, पेन्शनसह मेडिक्लेम योजना लागू करावी, यासह विविध दहा मागण्यांचे निवेदन कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्यावतीने शिरोळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद दातार यांना देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास २४ मे रोजी एकदिवसीय संप करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच लसीकरण मोहीमदेखील सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये आशा व गटवप्रवर्तकांनाही सामील करून घेतले आहे. आशा व गटप्रवर्तकांना कोणतीही सुरक्षेची साधने न देता तपासणी करणे, कोविड सेंटरची ड्युटी, लसीकरण केंद्रावर ड्युटी, तसेच होमक्वारंटाईन असलेल्यांची ऑक्सिजन पातळी तपासणी, आदी कामे त्यांच्याकडून विनामोबदला करून घेतली जात आहेत. त्यामुळे त्यांना ४५ व्या श्रम आयोगाच्या शिफारशीनुसार किमान वेतन लागू करावे, कोविड लसीकरण ड्युटी आशांना बंधनकारक नसतानाही ड्युटी लावली जात आहेत, त्यासाठी मानधनाची विशेष तरतूद करावी. कोविड सुरक्षाचे साहित्य देण्यात यावे. प्रतिदिन ३०० रुपये मोबदला देण्यात यावा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास २४ मे रोजी एकदिवसीय संप करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष नेत्रदिपा पाटील, उज्ज्वला पाटील, संगीता पाटील, माया पाटील, सीमा पाटील, वसुधा कुरणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.