कोल्हापूर : आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी केंद्र व राज्य सरकारकडे वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ आशा व गट प्रवर्तकांच्या राष्ट्रीय फेडरेशनच्या वतीने सोमवार, दि. २४ रोजी एकदिवसीय लाक्षणिक देशव्यापी संप करण्यात येणार आहे, अशी माहिती आशा व गटप्रवर्तक युनियनच्या जिल्हा सचिव उज्ज्वला पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे की, आशा व गट प्रवर्तक यांना कोरोना काळात नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे राबविले जात आहे; परंतु त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. उलट त्यांना अधिकारी काढून टाकण्याची धमकी देतात, तर सर्वेक्षणाला गेल्यावर त्यांच्यावर अनेकदा हल्लेही झाले आहेत.
कोविड काळात सक्षम व समर्थपणे सेवा देणाऱ्या या आघाडीच्या कामगारांना कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले, ही अभिमानाची बाब असली तरी त्यांना गरजेपुरता मोबदला दिला जात नाही. अशा भयंकर महामारीत काम करताना काहींना प्राण गमवावे लागले. परिणामी त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले, त्यांची मुले पोरकी झाली.
तरीही केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे.
आशा व गट प्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे व किमान २२ हजार रुपये वेतन द्यावे, अशी मागणी सिटू करीत असून राज्यातील सर्व आशा व गट प्रवर्तकांनी या लाक्षणिक संपात सहभाग घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.