कोल्हापूर : राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेली द्विसदस्यीय समिती आज, शुक्रवारपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहे. दौऱ्यात ही समिती हद्दवाढ समर्थक आणि हद्दवाढ विरोधक या दोन्ही बाजूंशी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात बैठक घेऊन चर्चा करणार आहे. या दोन दिवसांच्या दौऱ्यात ही समिती काही गावांना भेटी देण्याचीही शक्यता आहे.नगरविकास विभागाचे उपसचिव ज. ना. पाटील आणि अ. र. परशुराम यांची शहराच्या हद्दवाढीबाबत चर्चा करून अहवाल देण्यासाठी नियुक्ती केली आहे. आज, शुक्रवारी ही द्विसदस्यीय समिती कोल्हापूर दौऱ्यावर येत आहे. समितीसमोर महानगरपालिका प्रशासन हद्दवाढ आवश्यक असल्याबाबत आपली बाजू प्रात्यक्षिकांद्वारे मांडणार आहे. दरम्यान, दोन्हीही बाजूंनी लेखी म्हणणे समितीसमोर सादर करण्याचे आवाहनही केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर शहराच्या रखडलेल्या हद्दवाढीचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. नगरविकास विभागाने फेबु्रवारी महिन्यात महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या १८ गावे आणि २ औद्योगिक वसाहतींच्या प्रस्तावांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवालही मागवून घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी अठरा गावांपैकी शिये, वडणगे, आंबेवाडी, शिरोली, नागांव ही पंचगंगा नदीपलीकडील पाच गावे व दोन औद्योगिक वसाहती वगळण्याची शिफारस केली आहे पण ही शिफारस समर्थक समितीला मान्य नाही.यापूर्वी या द्विसदस्यीय समितीचा दि. ३१ मे व १० जूनचा दौरा अचानक रद्द झाला होता, त्यानंतर आज, शुक्रवारी ही समिती दौऱ्यावर येत आहे. त्यामुळे हद्दवाढ समर्थनार्थ आणि विरोधात या दोन्हीही बाजूंनी प्रभावी मुद्दे मांडण्याची तयारी दोन्हीही बाजूंनी केली आहे. (प्रतिनिधी)
हद्दवाढप्रश्नी द्विसदस्यीय समिती आज कोल्हापुरात
By admin | Published: June 17, 2016 12:56 AM